पत्रकार छत्रपती हत्याकांडप्रकरणी पंचकुलाचे विशेष सीबीआय कोर्ट शुक्रवारी आपला निर्णय देणार आहे. यामधील प्रमुख आरोप डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात सुनावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर पंजाब-हरयाणाच्या अनेक जिल्ह्यांसह चंडीगडमध्ये अॅलर्ट देण्यात आला आहे.

पंजाबच्या मालवा भागात आठ जिल्ह्यांच्या सुरक्षेसाठी २५ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. पंचकुलामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. येथे जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले आहे. न्यायाधीशांची सुरक्षा वाढवण्याबरोबर कोर्टाच्या परिसरात २४० जवान तैनात करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे पंचकुलाच्या चारही प्रवेशद्वारांसह १७ नाक्य़ांवर सुमारे १२०० सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. डीसीपी कमलदीप यांनी सांगितले की, माध्यमांनादेखील कोर्टाच्या २०० मीटर अंतरावरील परिसरातच प्रवेश देण्यात येणार आहे.

सुनावणीमुळे गुप्तचर यंत्रणाना हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या हत्याकांडप्रकरणी १६ वर्षांनंतर निकाल येणार आहे. सीबीआय कोर्टानेच बाबा राम रहिमला आश्रमातील साध्वींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

त्याचबरोबर पंजाबच्या मालवा भागातील आठ जिल्ह्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी २५ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. भडिंटा आणि मानसा या शहरांना अतिसंवेदनशील मानत येथे १५ कंपन्यांसाठी १२०० जवान तैनात करण्यात आले आहेत. फिरोजपूर जोन अंतर्गत मोगा, फरीदकोट, फाजिल्का आणि फरोजपूर येथे १० कंपन्यांचे ७०० अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.