तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी  घेतील, असे आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष बी. सत्यनारायण यांनी स्पष्ट केले आहे.
स्वतंत्र तेलंगणा राज्यनिर्मितीच्या मागणीसाठी टीआरएसचा जन्म झाला, आता तेलंगणा राज्य वास्तवात आले आहे, त्यामुळे आता स्वत:च्या भवितव्याबाबतचा निर्णय टीआरएसने घ्यावयाचा आहे, असेही सत्यनारायण म्हणाले.
काँग्रेस पक्षातून मोठय़ा प्रमाणावर नेते, कार्यकर्ते अन्य पक्षांत जात आहेत त्याबाबत विचारले असता सत्यनारायण म्हणाले की, निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या घटना होतच असतात. काही नेते स्वार्थासाठी अन्य पक्षांत जात आहेत, मात्र अशा नेत्यांना जनतेकडून धडा मिळेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने दिलेले आश्वासन पाळल्याने आता टीआरएसने बिनशर्त काँग्रेस पक्षात विलीन व्हावे, अशी मागणी माजी मंत्री पी. लक्ष्मैया यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.