लष्करी अधिकारी लेफ्ट. जनरल एस.एस. ठकराल यांना देण्यात आलेल्या दोन बढत्या बेकायदा असल्याचे स्पष्ट करून दिल्ली उच्च न्यायालयाने त्या रद्द ठरविल्या असून ब्रिगेडियर पदावर त्यांची पदावनती केली आहे.न्या. गीता मित्तल व जे.आर. मिढा यांच्या पीठाने यासंबंधी आदेश देताना ठकराल यांना देण्यात आलेल्या दोन बढत्या रद्द केल्या. १९७४ च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या ठकराल यांना २००९ व २०११ मध्ये बढत्या देण्यात आल्या होत्या. या बढत्या देताना कर्मचारी निवड आयोगाने विद्यमान कार्यपद्धतीचा अवलंब न करता आपल्या अधिकारांचा अयोग्य रीतीने वापज्ञर केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. ठकराल यांना प्रथम मेजर जनरल व नंतर लेफ्ट. जनरल म्हणून नियुक्त करताना योग्य कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला नाही. हे करताना अधिकारांचा वापर एकतर्फी करण्यात आला, असेही न्यायालयाने म्हटले असून १२ ऑगस्ट २००९ व १८ ऑगस्ट २०११ रोजी निवड आयोगाने यासंबंधी जाहीर केलेले निकाल न्यायालयाने रद्द केले. ठकराल यांना ‘रिमाउंट व्हेटेरिनरी कॉर्पोरेशन’मध्ये मेजर जनरल व लेफ्ट. जनरल या पदांवर बढती देण्यात आली होती. ठकराल यांना बढती देताना निवड आयोगाने घिसाडघाई केली तसेच एकतर्फी निर्णय घेतला, अशी तक्रार करून १९७६ च्या तुकडीचे मेजर जनरल श्रीकांत शर्मा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ठकराल यांना बढती देताना निवड आयोगाने बेकायदा निर्णय घेतल्यामुळे आपल्या बढतीवर परिणाम झाला, असाही आरोप शर्मा यांनी आपल्या याचिकेत केला होता.