नॅशनल हेराल्ड प्रकरणात आरोपी असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व त्यांचे चिरंजीव राहुल यांच्यासह इतरांविरुद्ध कनिष्ठ न्यायालयात पुरावा मांडावा, यासाठी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने या सर्व आरोपींना त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

न्या. सुरेश कैत यांनी सोनिया व राहुल गांधी, अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस ऑस्कर फर्नाडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया कंपनी यांना नोटीस जारी करून स्वामी यांच्या याचिकेवर १२ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आणि तोवर या प्रकरणाची कार्यवाही स्थगित केली.

या प्रकरणात गांधीद्वय व इतर आरोपींविरुद्ध खटला भरण्यासाठी पुरावा मांडण्यात यावा, यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेला अर्ज कनिष्ठ न्यायालयाने तात्पुरता अमान्य केला होता. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. स्वामी यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४४ अन्वये केलेल्या अर्जावर, या प्रकरणात त्यांची साक्ष पूर्ण झाल्यानंतरच विचार करण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयाचे सरचिटणीस, एक उप भूमी आणि विकास अधिकारी व एक प्राप्तिकर उपायुक्त यांच्यासह काही साक्षीदारांना पाचारण करावे, तसेच या प्रकरणाचा भाग असलेली काही कागदपत्रे सिद्ध करण्याचे निर्देश त्यांना द्यावेत, अशी मागणी स्वामी यांनी केली होती.