सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचारप्रकरणी ‘तेहलका’चा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याचा जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.
तेजपाल हा सध्या वास्को येथील सडा तुरुंगात असून गोवा खंडपीठाचे न्या. यू. के. बाक्रे यांनी तेजपालचा अर्ज फेटाळला. तेजपालचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यानंतर त्याला गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला तेव्हा तो न्यायालयात उपस्थित होता.
तेजपालच्या आजारी आईला सध्या म्हापसा येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून तिला भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली. आपली आई सध्या मेंदूच्या विकाराने आजारी असून तिचा आजार अंतिम टप्प्यात असल्यामुळे भेटण्याची परवानगी तेजपालने गुरुवारी मागितली होती. तेजपालला शनिवारी सकाळी रुग्णालयात नेण्यात येईल, असे त्याचे वकील स्वप्निल नाचिनोलकर यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन फेटाळण्यात आल्यामुळे या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार तेजपाल करीत आहे. आम्ही अद्याप न्यायालयाचा आदेश बघितलेला नाही. मात्र, सर्व पर्याय आम्ही तयार ठेवले आहेत, असे तेजपालचे वकील अ‍ॅड. संदीप कपूर यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयास एक आठवडय़ाची सुट्टी असून त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे धाव घेणार असल्याचे कपूर म्हणाले.