देशात सलग दुसऱ्या दिवशी करोना रुग्णांमध्ये उच्चांकी वाढ झाली असून गेल्या २४ तासांमध्ये ६६ हजार ९९९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३७ वर पोहोचली आहे.

आतापर्यंत ४७ हजार ३३ मृत्यू झाले असून गेल्या २४ चोवीस तासांमध्ये ९४२ रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. दैनंदिन करोनामुक्त रुग्णांचीही विक्रमी नोंद झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये ५६,३८३ रुग्ण बरे झाले.  हे प्रमाण ७०.७६ टक्क्यांवर पोहोचले असून सुमारे १७ लाख रुग्ण बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्ण ६,५३,६२२ आहेत. मृत्यू दर दोन टक्क्यांपेक्षाही कमी १.९६ टक्क्यांवर आला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या. बुधवारी दिवसभरात ८.३ लाख चाचण्या केल्या गेल्या. एकूण २.६८ कोटी चाचण्या झाल्या असून १० लाख लोकसंख्येमागे १९ हजार ४५३ चाचण्या केल्या जात आहेत. या आठवडय़ात प्रतिदिन ६ लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्या गेल्या आहेत.

मुंबईत १२०० नवे रुग्ण

मुंबई: मुंबईत गुरुवारी १२०० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा सात हजारांच्याजवळ पोहोचला आहे. मृतांमध्ये ५० ते ६० वयोगटातील रुग्णांचा अधिक समावेश आहे. तर दुसऱ्या बाजूला ७९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील करोना रुग्णवाढीचा दर आटोक्यात आला आहे. सध्या दर दिवशी सरासरी ०.८० टक्के रुग्णवाढ होत आहे.  तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८७ दिवसांवर गेला आहे. गुरुवारी एका दिवसात ८८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एक लाख ९५४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सध्या १९,३३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १२,८५० रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर ५,१०१ रुग्णांना लक्षणे आहेत. त्यापैकी १११३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.  गुरुवारी ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यापैकी ३० रुग्ण पुरुष व १८ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४ जणांचे वय ४० पेक्षा कमी होते. तर ३५ रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त होते. मृतांचा एकूण आकडा ६९८८ वर गेला असून त्यापैकी ५७३७ मृत हे ५० वर्षांवरील होते.

ठाणे जिल्ह्य़ात १,२२६ जणांना संसर्ग, ५१ मृत्यू

ठाणे : जिल्ह्य़ात गुरुवारी १ हजार २२६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या १ लाख २ हजार ८०२ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात ५१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्य़ात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ९२५ इतकी झाली आहे. ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी १ हजार २२६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील ३३०, नवी मुंबईतील ३१७, ठाण्यातील १९३, मीरा-भाईंदर शहरातील १४६, ठाणे ग्रामीणमधील ८२, बदलापूर शहरातील ६१, उल्हासनगर शहरातील ४६, अंबरनाथमधील ३५ आणि भिवंडीतील १६ रुग्णांचा समावेश आहे. तर, गुरुवारी जिल्ह्य़ात ५१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये ठाणे ग्रमीणमधील ११, कल्याण-डोंबिवलीतील ९, मीरा-भाईंदरमधील ९, ठाण्यातील ८, नवी मुंबईतील ७, उल्हासनगरमधील ४ आणि अंबरनाथमधील ३ रुग्णांचा समावेश आहे.