जागतिक हवामान संघटनेची माहिती

पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले असून पॅरिस हवामान करारातील उद्दिष्टे गाठण्यासाठी कृती करण्याची नितांत गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या माहितीनुसार २०१६ या वर्षांत वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. २०१६ मध्ये ते ४०३.३ पीपीएम होते, तर २०१५ मध्ये ४०० पीपीएम होते. मानवी कृती व एल निनो यामुळे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले आहे. ग्रीनहाऊस गॅस बुलेटिन या संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक संस्थेने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात १९७० पासून वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढतच गेले त्यात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण तर खूपच वाढले. कार्बन डायॉक्साईडची संहती वाढण्याचे प्रमाण एवढे जास्त तीन ते पाच दशलक्ष वर्षांपूर्वी होते. त्यावेळी सागरी पातळी आताच्या पेक्षा २० मीटरने अधिक होती. कार्बन डायॉक्साईड व हरितगृह वायूंच्या प्रमाणात कपात केल्याशिवाय आपण तापमानवाढीच्या धोक्यापासून वाचू शकत नाही. शतकाअखेरीस हे प्रमाण खूपच वाढलेले असेल त्यामुळे पॅरिस करारात दिलेली हवामान उद्दिष्टे पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे जागतिक हवामान संघटनेचे प्रमुख पेटेरी तलास यांनी सांगितले.

पॅरिस कराराला १९६ देशांनी मान्यता दिलेली असून अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली आहे. पुढील आठवडय़ात बॉन येथे हवामान बदलाबाबत बैठक होत आहे. संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरण प्रमुख एरिक सोलहेम यांनी सांगितले की, आकडे खोटे बोलत नाहीत आपण अजूनही जास्त प्रमाणात कार्बन डायॉक्साईड वातावरणात सोडत आहोत ते कमी झाले पाहिजे.