जयपूर : अल्वर येथे २१ जुलैला झालेल्या घटनेत गोतस्करीच्या संशयावरून रकबर खान याच्यावर जमावाने प्राणघातक हल्ला केल्यानंतर पोलिसांनी गायींना सुरक्षित ठिकाणी नेण्यात तत्परता दाखवली पण जखमी अवस्थेतील रकबर खान याला रुग्णालयात नेण्यात विलंब केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राजस्थान पोलिसांनी सोमवारी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक ओ.पी. गल्होत्रा यांनी सांगितले की, खान याला रुग्णालयात नेण्यास पोलिसांनी विलंब केला असे आरोप झाले असून याची चौकशी करण्यासाठी चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे.

अकबर उर्फ रकबर खान याच्यावर गोतस्करीच्या संशयावरून  शुक्रवार व शनिवारच्या मधल्या रात्री  जमावाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करण्याऐवजी अकबर खान यालाच मारहाण केली, असाही आरोप असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी समितीत पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) एन.आर.के. रेड्डी, अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी- गुन्हे अन्वेषण  शाखा पी.के सिंह, जयपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक हेमंत प्रियदर्शी, राज्याचे समन्वय अधिकारी (गोरक्षा) महेंद्र सिंह चौधरी यांचा समावेश आहे.

या प्रकरणाची आणखी वेगळी र्सवकष चौकशी होत असून ती पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिली आहे. रकबर खान याच्या हत्या प्रकरणी धर्मेंद्र यादव व परमजित सिंह यांना याआधी अटक केली असून नरेश सिंह याला काल अटक करण्यात आली. त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे.

अल्वरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, अकबर खान याला सोडवण्याऐवजी पोलिसांनी त्यालाच मारहाण केली व रुग्णालयात नेण्यास विलंब केला असा आरोप असून  त्याची चौकशी केली जाईल. लालवंडी येथे रकबर खानवर जमावाने हल्ला केला तेव्हा  पोलिसांनी त्याला रामपूर येथील आरोग्य केंद्रात नेण्यास अडीच तासांचा विलंब केला.

रकबर व त्याचा मित्र अस्लम हे त्यांच्या गायी रामगडच्या जंगलातून प्रवास करीत हरयाणात नेत असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केला त्यावेळी अस्लम पळून जाण्यात यशस्वी झाला होता. रामगड पोलीस स्टेशनला याप्रकरणी विहिंपचे रामगड गोरक्षाप्रमुख नवल किशोर शर्मा यांनी शनिवारी पहाटे १२.४१ वाजता याबाबत फिर्याद दिली होती.  पोलीस तेथे सव्वा वाजता पोहोचले. नंतर अकबरची जबानी घेण्यात आली व त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

पहाटे ४ वाजता त्याला आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यात अकबर उर्फ रकबर खान याचा मृत्यू जमावाच्या मारहाणीत झाला की पोलिसांच्या याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी रामगडचे आमदार ग्यानदेव आहुजा यांनी केली आहे.

पूर्वीच्या पोलीस नोंदीनुसार नौगनवा पोलीस स्टेशनला अकबर उर्फ रकबर खान याच्या विरोधातच गायींची निर्यात, गोतस्करीचे गुन्हे दाखल असून त्यावेळी त्याच्याकडून दोन गायी ताब्यात घेण्यात आल्या होत्या.