दहशतवाद्यांनी प्रथमच ड्रोनचा वापर करून रविवारी पहाटे जम्मू विमानतळावरील भारतीय हवाई दलाच्या तळावर बॉम्बहल्ला केला. त्यांच्या स्फोटात हवाई दलाचे दोन अधिकारी जखमी झाले. या प्रकरणाची केंद्राने गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सायंकाळी ४ वाजता उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीचा अजेंडा काय असेल हे अद्याप समजू शकलेले नाही, परंतु यात अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित अनेक बडे अधिकारीही या बैठकीत भाग घेतील. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याबद्दलही चर्चा होऊ शकते. हवाई दलाच्या तळावर हल्ला झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सर्व सुरक्षा संस्था सतर्क करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

काय झालं होतं

दहशतवाद्यांनी ड्रोन विमानातून स्फोटके पाठवून रविवारी भारतीय हवाई दल केंद्रावर हल्ला केला होता, त्यात दोन बॉम्बचा समावेश होता. त्यात दोन अधिकारी जखमी झाले होते. ड्रोन्सच्या मदतीने जम्मूत करण्यात आलेला हा पहिलाच हल्ला होता.

हेही वाचा- “जम्मू-काश्मीरमधील लोकशाही प्रक्रियेसाठी बांधील”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्वपक्षीय नेत्यांना आश्वासन!

सोमवारी आणखी दोन ड्रोनची घुसखोरी

रातनुचाक—कालुचाक लष्करी भागात सोमवारी दोन ड्रोन्सवर लष्कराच्या जवानांनी सतर्कता दाखवत गोळीबार केला. रविवारी रात्री ११.४५ वाजता पुन्हा एक ड्रोन विमान हद्द ओलांडून आले होते. त्यानंतर दुसरे ड्रोन पहाटे २.४० वाजता आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तेथे उपस्थित सैनिकांनी गोळीबार करताच ही दोन्ही ड्रोन विमाने माघारी गेली.

हेही वाचा- जम्मूमध्ये हवाई दलाच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा तपास NIA कडे; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

नरेंद्र मोदी यांची काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा

गेल्या आठवड्याभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत होणाऱ्या काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. जम्मू-काश्मीरची विभागणी केल्यानंतर आणि कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान या सर्वपक्षीय नेत्यांना भेटत होते. या बैठकीमध्ये अपेक्षेप्रमाणेच सर्वच पक्षांच्या नेत्यांनी काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. यासोबतच, विधानसभा निवडणुका, काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन, राजकीय कैद्यांची सुटका अशा काही प्रमुख मागण्या या पक्षांकडून करण्यात आल्या. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी सविस्तर चर्चा करून पुढील पावलं कोणत्या दिशेनं उचलली जातील, याचे सूतोवाच केले. सूत्रांच्या हवाल्याने एएनआयनं बैठकीतील वृत्तांत दिला आहे.