खलिस्तानी दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्याने दिल्लीमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या संघटनेतील दोन दहशतवादी संसदेवर हल्ला करणार असून त्यासाठी उत्तर प्रदेशातील एका गाडीचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहितीही गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लखविंदरसिंग आणि परमिदरसिंग हे दोन खलिस्तानी दहशतवादी नेपाळमार्गे भारतात आले असून ते इनोव्हा गाडीने भारतात आल्याची माहिती मिळाली आहे. गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलीस यांना एकाच वेळी ही माहिती मिळाल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. दिल्ली पोलिसांना निनावी दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली तो भ्रमणध्वनी क्रमांक उत्तराखंडमधील असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांचे एक पथक उत्तराखंडला रवाना झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पाश्र्वभूमीवर हल्ला केला जाईल, अशी माहितीही मिळाली आहे. चोरलेल्या सरकारी वाहनामध्ये बॉम्ब ठेवूनही हल्ला घडविण्यात येऊ शकतो, अशी माहितीही मिळाली आहे.