उत्तर प्रदेश अन्न व औषध प्राधिकरणाने (एफडीए) केलेल्या तपासणीत यिप्पी नूडल्स या आयटीसी लि. कंपनीच्या नूडल्समध्येही शिशाचे प्रमाण जास्त आढळून आले आहे.एफडीएने यिप्पी नूडल्सचे नमुने एका स्थानिक मॉलमधून जप्त केले व त्यांची तपासणी केली असता त्यात शिसे प्रमाणापेक्षा जास्त सापडले. आता या प्रकरणी अन्न आयुक्तांच्या परवानगीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही आठवडय़ात ही प्रक्रिया पूर्ण होईल.या आधी नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्समध्ये जादा शिसे सापडले होते तसेच मोनो सोडियम ग्लुटामेटचे प्रमाणही अधिक होते. मॅगीच्या मागचे शुक्लकाष्ठही उत्तर प्रदेशातूनच सुरू झाले होते. आता त्यात यिप्पी नूडल्सचाही समावेश झाला आहे.अन्न व औषध प्राधिकरणाच्या अलिगड विभागाचे प्रमुख चंदन पांडे यांनी सांगितले की, नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल मिळाले असून त्यात शिसे १.०५७ पीपीएम एवढे सापडले आहे, ते १ पीपीएम पर्यंत घातक मानले जात नाही.२१ जूनला अधिकाऱ्यांनी स्थानिक मॉलमधून वेगवेगळ्या अन्नपदार्थाचे ८ नमुने गोळा केले होते त्यात यिप्पी नूडल्सचाही समावेश होता. नंतर ते नमुने तपासणीसाठी लखनौ व मीरत येथे पाठवण्यात आले. जादा शिशामुळे मुलांना रोग होतात तसेच प्रौढांनाही मेंदूचे आजार होतात, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे.