जगभरातील खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कोविड १९ विषाणूवरील लशींची किंमत भारतात अधिक असल्याचे दिसून आले आहे. इतर देशांत लशींच्या  किमती खुल्या बाजारात फार जास्त नाहीत.

स्वदेशी लस असलेल्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे दर राज्यांना ६०० रुपये व खासगी रुग्णालयांना १२०० रुपये असे लावण्यात आले आहेत तर सीरम इन्स्टिट्यूटने त्यांच्या कोव्हिशिल्ड लशीचे दर राज्यांना ४०० रुपये व खासगी रुग्णालयांना ६०० रुपये इतके जाहीर केले आहेत. पण दोन्ही लशीतील किमतीचा फरक कशामुळे याचे स्पष्टीकरण झालेले नाही.

किंबहुना काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी या किमतीतील फरकाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भारत बायोटेक व सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोन्ही संस्थांनी लशींच्या वाढीव किमतीचे समर्थन केले आहे.

लशीची भारतातील किंमत व इतर देशातील लशींच्या किमती यांची तुलना करणे अन्याय्यपणाचे होईल असे मत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केले होते. भारत बायोटेकने किमतीचे स्पष्टपणे समर्थन केले नसले तरी खर्च भरून निघण्यासाठी एवढी किंमत ठेवल्याचे म्हटले आहे. राज्यांना जाहीर केलेल्या किमतीत कदाचित आणखी वाढ ग्राहकांच्या माथी मारली जाणार नाही पण खासगी रुग्णालये जादा दर आकारू शकतात.

कोव्हॅक्सिन या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील प्राथमिक निष्कर्ष जाहीर झाले असून त्यात ती लस  ७८ टक्के प्रभावी दिसून आली आहे व गंभीर कोविड आजारात १०० टक्के संरक्षण मिळत आहे पण ही प्राथमिक माहिती असून पक्की माहिती जूनमध्ये जाहीर होणार आहे. स्वदेशी लस म्हणून कोव्हॅक्सिनचा उल्लेख वारंवार केला गेला आहे कारण ती आयसीएमआर व पुण्याच्या एनआयव्ही यांच्या मदतीने भारत बायोटेक या कंपनीने तयार केली आहे. कोव्हिशिल्ड ही सीरमची लस  ७० टक्के प्रभावी असून तिची दुसरी मात्रा महिनाभराने घेतल्यानंतर ९० टक्के परिणामकारकता दिसते. आतापर्यंत  भारतात जे लसीकरण झाले आहे त्यात ९० टक्के लोकांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली आहे. कोव्हॅक्सिन या लशीची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर चार ते सहा आठवड्यांनी घ्यायची आहे तर कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा पहिल्या मात्रेनंतर चार ते आठ आठवड्यांनी अर्धीच घ्यायची आहे.

१ मे पासून १८ वर्षे ते ४५ वर्षे वयोगटासाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे.  त्यासाठी कोविन संकेतस्थळावर नोंदणी करायची असून ती २८ एप्रिलपासून सुरू होत आहे. खासगी रुग्णालये व राज्य सरकारे वेगवेगळी लस खरेदी करणार आहे पण राज्यांनी लस मोफत द्यावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्राचा दावा

केंद्र सरकारच्या सर्व रुग्णालयांमध्ये लसीकरण मोफत ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड लस प्रतिमात्रा १५० रूपये दराने खरेदी करण्याचे ठरवले आहे. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ, गोवा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, सिक्कीम, पश्चिाम बंगाल,तमिळनाडू यांनी मोफत लस देण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रही तशी घोषणा करण्याची शक्यता आहे. लशींचे दर खासगी रुग्णालये व राज्य सरकार यांच्यासाठी निश्चित केले असतील तरी काही रुग्णालये त्यांचे शुल्क लावून जास्त दर आकारू  शकतात अशी शक्यता व्यक्ते केली जाते, पण  नोंदणीकरण होणार असल्याने  जास्त दर आकारता येणार नाहीत असे केंद्राचे म्हणणे आहे.