लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिल रोजी पार पडले. तर एखेरचा टप्पा 19 मे रोजी पार पडला. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून देशात पुन्हा एकदा रालोआचे बहुमताचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. यातच जानेवारी ते मे महिन्यादरम्यान ट्विटरवर निवडणुकीसंदर्भात करण्यात आलेल्या ट्विटच्या संख्येने 30 कोटींचा टप्पा गाठला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आणि निवडणूक पूर्व कालावधीत म्हणजेच जानेवारी ते मे महिन्यादरम्यान निवडणुकीसंदर्भात तब्बल 39.6 कोटी ट्विट करण्यात आले. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या अनेक पटीने अधिक आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर 1 जानेवारी ते 12 मे दरम्यान निवडणुकीसंदर्भात 5.6 कोटी ट्विट करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका ट्विटला एक लाखापेक्षा अधिक वेळा रिट्विट करण्यात आले. तर त्या ट्विटला 3.18 लाख लाईक्स मिळाले आहेत. ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष, ट्विटर युजर्स आणि मीडियाकडून 1 जानेवारी ते 23 मे दरम्यान 39.6 कोटी ट्विट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, ट्विटरकडून कोणत्या देशातून किती ट्विट करण्यात आले याबाबत माहिती देण्यात आली नाही. असे असले तरी निकालाच्या दिवशी म्हणजेच 23 मे रोजी मतमोजणीदरम्यान 32 लाख ट्विट करण्यात आल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले. यापैकी एक तृतीयांशी ट्विट हे दुपारी तीन ते चारच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटनंतर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मोदींनी ‘सबका साथ +सबका विकास +सबका विश्वास =विजयी भारत।’ अशा आशयाचे एक ट्विट यादरम्यान केले होते.