जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 6 हजार 977 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहचली आहे.

देशभरातील तब्बल 1 लाख 38 हजार 845 करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले 77 हजार 103 जण, उपाचारानंतर रुग्णालायतून सुट्टी देण्यात आलेले 57 हजार 720 व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 4 हजार 021 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.

भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत  भारत १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्थान नंतर आता १० व्या क्रमांकावर भारत पोहोचला आहे. भारतात सध्या 77 हजार 103 करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत भारत अमेरिका, रशिया, ब्राझिल आणि फ्रान्सनंतर पाचव्या क्रमांकावर आहे. जगभरात सध्या करोनाचे एकूण 28 लाख अॅक्टिव्ह रुग्ण असून एकट्या अमेरिकेत ही संख्या 11 लाख आहे.