जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा देशात कहर सुरू असल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, ३०६ जणांचा करोनाने  मृत्यू झाला आहे.  देशभरातील करोनाबाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

देशात सद्यस्थितीस ४ लाख १० हजार ४६१ करोनाबाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले १ लाख ६९ हजार ४५१ जण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले २ लाख २७ हजार ७५६ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३ हजार २५४ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रात काल ३८७४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. २४ तासांमध्ये १६० रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर कालपर्यंत राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाख २८ हजार २०५ पोहचली होती.. राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.४ टक्के इतकं आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ४.६७ टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यात सध्या ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन अशी देखील माहिती मिळालेली आहे.

करोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर औषध अखेर भारतात उपलब्ध झालं आहे. औषध तयार करणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीने यासंदर्भातला दावा केला आहे. या औषधाला सरकारतर्फे मंजुरीही मिळाली आहे. करोनाची सौम्य लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना हे औषध दिलं जाऊ शकतं. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने हे औषध समोर आणलं आहे. ग्लेनमार्कच्या या औषधाला सीडीएससीओने फेविपिरावीर फेबीफ्लू च्या उत्पादन आणि वितरणाला मंजुरी दिली आहे.

भारतीय औषध महानियंत्रक संस्थेकडून म्हणजेच DCGI या संस्थेकडून या औषधाच्या उत्पादन आणि वितरणाला संमती देण्यात आली असल्याचे मुंबईतील कंपनीने सांगितले. करोना संसर्गावर अशा प्रकारे मंजुरी मिळालेले हे पहिलेच औषध आहे. लाइव्हमिंटने या संदर्भातले वृत्त दिले आहे.