भारतामध्ये दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३२ हजार ६९५ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ९ लाख ६८ हजार ८७६ वर पोहोचली आहे. देशभरात गेल्या २४ तासांत आणखी २० हजार ५७२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत सहा लाख १२ हजार ८१५ रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण ३ लाख ३१ हजार १४६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

गेल्या आठ दिवसांत २५ हजारांनी वाढणारी करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी वाढली आहे. आठ दिवसांत दोन लाख रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे.

बरे होणाऱ्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६३.२४ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ६०६ मृत्यू झाले असून, आतापर्यंत २४ हजार ९१५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अधिकाधिक होत असलेल्या चाचण्या, वेळेवर होणारे निदान आणि प्रभावी उपचार या प्रामुख्याने तीन बाबींमुळे रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.