‘ट्रॅफिक’च्या अहवालातील धक्कादायक वास्तव

नागपूर : जगभरातील एकूण वाघांपैकी ५६ टक्के वाघ भारतात असले तरी  वाघांच्या शिकारीचे सर्वाधिक प्रमाणदेखील भारतातच आहे. व्याघ्र अवयवांच्या जप्तीच्या एकूण घटनांपैकी सुमारे ४०.५ टक्के घटना या भारतातील आहेत. वन्यप्राणी आणि वनस्पतींवर काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ‘ट्रॅफिक’ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

२००० ते २०१८ या १८ वर्षांच्या काळात जगभरातील ३२ देशांतून दोन हजार ३५९ वाघांच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले. यात प्रामुख्याने हाडे, कातडी याचा समावेश आहे. यापैकी एक हजार ८६ घटना या १३ आशियाई देशातील आहेत. या तेरा देशात दरवर्षी सरासरी ६० जप्तीच्या घटना नोंदवण्यात आल्या. वाघाव्यतिरिक्त अस्वल आणि हत्तीचे अवयव देखील मोठय़ा प्रमाणावर जप्त करण्यात आले. दरवर्षी सुमारे ५८ वाघांची शिकार त्याच्या कातडीसाठी केली जाते. २०१६ पासून हे प्रमाण अधिक वाढले आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत सरासरी वार्षिक ४४ टक्क्य़ांपासून ते ७३ टक्क्य़ांपर्यंत हे प्रमाण वाढले आहे.

वाघांच्या अवयवांच्या तस्करी प्रकरणात एकूण किती आरोपींना पकडण्यात आले आणि त्यापैकी किती आरोपींना शिक्षा झाली याची पूर्ण आकडेवारी नाही. मात्र, अहवालानुसार ५९१ प्रकरणांत सुमारे एक हजार १६७ आरोपींना अटक करण्यात आली. यातील ३८ टक्क्य़ांपेक्षाही अधिक आरोपी भारतातील आहेत. भारतानंतर इंडोनेशिया आणि चीनचा नंबर आहे. अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींपैकी २५९ आरोपींवर तिन्ही देशात खटला चालवण्यात आला. यातील १७.४ टक्के आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. भारतात वाघांची संख्या अधिक असल्यामुळे शिकारीचे प्रमाणही अधिक आहे. मात्र, वन्यजीवविषयक कडक कायदेही भारतात आहेत. गेल्या एक-दीड दशकात व्याघ्र संरक्षणाचे प्रयत्नही वाढले आहेत. २००८ साली भारतात वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापन करण्यात आल्यानंतर वाघ्र अवयवांच्या तस्करीची प्रकरणे उघडकीस आली असून अनेक मोठय़ा तस्करांना अटक करण्यात आली आहे.

दरवर्षी १२४ वाघांचे अवयव जप्त

दरवर्षी १२४ वाघांच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले. यात भारत अग्रस्थानी असून दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया आहे.

* भारत – ४०.५ टक्के (४६३)

* चीन – ११ टक्के (१२६)

* इंडोनेशिया – १०.५ टक्के (११९)