डेमोक्रॅटिक पक्षाची अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यात आघाडी घेतलेल्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात खासगी ई-मेलचा वापर कार्यालयीन कामासाठी केल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. ती आपली चूकच होती असे त्यांनी कबूल केले. खासगी ई-मेलचा वापर केल्याचे प्रकरण श्रीमती क्लिंटन यांना अडचणीचे ठरत असून त्यासाठी त्यांनी शेवटी दिलगिरी व्यक्त केली. खासगी ई-मेल वापरण्यास त्या वेळी परवानगी होती त्यामुळे आपण चूक केलेली नाही पण तरीही तो चुकीचा निर्णय होता, असे गृहीत धरून आपण दिलगिरी व्यक्त करीत आहोत, असे त्या म्हणाल्या.
एबीसी न्यूजला त्यांनी सांगितले, की आपल्याला दोन्ही प्रकारच्या ई-मेल खात्यांचा वापर करण्याची परवानगी होती. व्यक्तिगत ई-मेल व कामाशी संबंधित ई-मेल अशी दोन खाती होती. त्यात एक खाते केवळ कार्यालयीन कामासाठी वापरण्यास हवे होते. ती चूकच होती आपण त्याबद्दल दिलगीर आहोत. त्याची जबाबदारीही आपण घेत आहोत. क्लिंटन (वय ६७) यांनी त्या वादाबाबत पश्चात्तापाची भावनाही व्यक्त केली. ते प्रकरण त्यांना प्रचारात अडचणीचे ठरत असून त्यावरच विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यापूर्वीच आपण या प्रकरणातील प्रश्नांना उत्तरे द्यायला हवी होती, पण त्याची गरज वाटली नसावी म्हणून आपल्या हातून पुढेही उत्तरे न देण्याची चूक झाली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीत त्यांचे नाव केवळ या प्रकरणामुळे मागे पडू लागल्याचे दिसताच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्या वेळी दोन खाती वापरलेली चालत होती त्यामुळे आपण कायद्याचा भंग केलेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.