आपले रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प हे व्हाइट हाऊसमध्ये निवडून आले तर ते रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे ‘बाहुले’ बनतील, अशी बोचरी टीका हिलरी क्लिंटन यांनी केली.

तिसऱ्या ‘प्रेसिडेंशियल डिबेट’ दरम्यान दोन्ही उमेदवारांना ‘विकिलीक्स’बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. रशियन सरकारने अमेरिकी लोकांविरुद्ध हे कारस्थान रचले आहे. त्यांनी अमेरिकी संकेतस्थळे हॅक केली, तसेच अमेरिकी लोकांची व संस्थांची खासगी खातीही हॅक केली. इंटरनेटवर टाकण्यासाठी त्यांनीच ही सर्व माहिती विकिलीक्सला दिली, असा आरोप हिलरींनी केला.

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी रशियन सरकारच्या सर्वोच्च पातळीवरून, म्हणजे पुतिन यांच्याकडून हे घडले असून आपल्या १७ गुप्तचर यंत्रणांनी त्याला दुजोरा दिला आहे, असे त्या म्हणाल्या.

ट्रम्प यांनी मात्र आपण पुतिन यांना ओळखत नसल्याचे सांगितले. ते माझ्याबद्दल चांगले बोलले आहेत. दोन्ही देशांनी सामंजस्य राखल्यास ते चांगलेच होईल. रशिया आणि अमेरिका या दोघांनी एकत्र येऊन आयसिसचा नि:पात केला, तर ती चांगलीच गोष्ट असल्याचे ते म्हणाले. अमेरिकी संकेतस्थळे हॅक करण्यामागे कोण आहे याची क्लिंटन यांना कल्पना नाही. पुतिन हे प्रत्येक टप्प्यावर हिलरींपेक्षा सरस ठरल्याने त्यांना पुतिन आवडत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

..त्या वेळी ट्रम्प रिअॅलिटी शोचे संचालन करत होते – हिलरी

यापूर्वीच्या अध्यक्षपदाच्या वादविवादात आपल्या अनुभवावर प्रश्नचिन्ह लावल्याबद्दल हिलरी क्लिंटन यांनी प्रतिस्पर्धी ट्रम्प यांच्यावर टीका केली. ओसामा बिन लादेन याला मारण्याच्या मोहिमेवर आपण देखरेख ठेवत असताना ट्रम्प हे एका रिअॅलिटी शोचे संचालन करत होते, असे त्या म्हणाल्या. १९८०च्या दशकात मी अर्कान्सासमधील शाळांच्या सुधारणांसाठी काम करत होते, तेव्हा ट्रम्प त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वडिलांकडून १४ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेत होते. १९९० च्या दशकात बीजिंगमध्ये गेले असताना महिलांचे अधिकार हे मानवाधिकार आहेत असे मी सांगितले. त्या वेळी ट्रम्प यांनी अलिसिया मचाडो या माजी ‘मिस युनिव्हर्स’चा अपमान केला, असे हिलरींनी सांगितले. ..आणि (२०११ साली) ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानात खात्मा करणाऱ्या मोहिमेवर मी नियंत्रण कक्षात बसून देखरेख करत असताना, ते ‘सेलेब्रिटी अॅप्रेंटिस’ या रिअॅलिटी शो चे संचालन करत होते. त्यामुळे ३० वर्षांच्या माझ्या अनुभवाची तुलना करताना मला आनंद वाटतो, असे क्लिंटन म्हणाल्या.

 

निवडणुकीचा निकाल कदाचित मान्य करणार नाही : ट्रम्प

तिसऱ्या ‘प्रेसिडेंशियल डिबेट’मध्ये क्लिंटन यांचा कमी आघाडीने विजय

लास वेगास : अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार करण्यात असून, या निवडणुकीत पराभव झाल्यास आपण कदाचित तो मान्य करणार नाही असे धक्कादायक संकेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले असून, त्यामुळे सत्तेचे हस्तांतरण सहजरीत्या होण्याच्या अमेरिकी लोकशाहीच्या परंपरेला धोका निर्माण झाला आहे.

ट्रम्प यांच्या या भूमिकेवर त्यांच्या डेमॉकॅट्रिक प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांनी जोरदार टीका केली. दोघांमधील तिसऱ्या व अंतिम अध्यक्षपदाच्या वादविवादात (प्रेसिडेंशियल डिबेट) क्लिंटन यांना विजेत्या जाहीर करण्यात आले. निवडणुकीचा निकाल मान्य करण्याबाबतचे रहस्य आपण ८ नोव्हेंबपर्यंत राखून ठेवू असे ट्रम्प म्हणाले.

तुम्ही निवडणुकीचा निकाल स्वीकारणार काय असा प्रश्न नेवाडा विद्यापीठात झालेल्या तिसऱ्या अध्यक्षपदाच्या वादविवादात ट्रम्प यांना विचारण्यात आला असता, त्याबाबत काय करायचे ते मी त्या वेळीच बघेन. तोवर मी तुम्हाला संभ्रमात ठेवेन असे ते उत्तरले.

या निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याच्या आरोपाचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. प्रसारमाध्यमे अप्रामाणिक आणि भ्रष्ट झाली आहेत. त्यांनी मतदारांची मने कलुषित केली आहेत. परंतु त्यांच्या दुर्दैवाने, मतदारांना हे सारे कळत आहे असे आपल्याला वाटत असल्याचे ते म्हणाले.

लास वेगासच्या वादात ट्रम्प यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आधुनिक अमेरिकी अध्यक्षपदाच्या काळात आजवर कधीही न दिसलेला धक्कादायक प्रसंग बघायला मिळाला आहे. सत्तेचे शांततेने आणि कुठल्याही वादाशिवाय हस्तांतर होते या अमेरिकी लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वावर त्यांच्या या भूमिकेमुळे सावट पडले असल्याचे सीएनएनने म्हटले आहे.

निवडणुकीचा निकाल मान्य करण्याबाबत आपल्या प्रतिस्पध्र्याने दिलेला नकार ‘भयावह’ असल्याचे डेमॉकॅट्रिक उमेदवार क्लिंटन म्हणाल्या. त्याहीपुढे जाऊन त्यांनी ट्रम्प यांचे वर्णन रशियन अध्यक्ष पुतिन यांचे ‘बाहुले’ असे केले. ज्या ज्या वेळी आपल्याला अनुकूल गोष्टी घडत नसल्याचे ट्रम्प यांना वाटते, त्या वेळी ते गैरप्रकाराची ओरड करतात, असे त्या म्हणाल्या.

‘अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझे वडील एक पाऊल मागे’

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा ट्रम्प ज्युनियर याने निवडणुकीत माझे वडील एक पाऊल मागे असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे माझे वडील राजकारण अगदीच नवखे असल्याचेही त्याने म्हटले आहे. वडिलांनी (ट्रम्प) राजकारणाचा कधीही कारकीर्द घडविण्याच्या दृष्टीने विचार केला नाही. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रोजगारनिर्मिती आणि कामगारांच्या फायद्याच्या गोष्टी केल्या. देशाला लाभ व्हावा हाच त्यांचा प्रयत्न होता, असेही ट्रम्प यांच्या मुलाने म्हटले आहे. आयुष्यभर त्यांनी रोजगारनिर्मितीचेच कार्य केल्यामुळे ते जगातील महान राजकीय नेते ठरतात, असेही ट्रम्प यांच्या मुलाने फॉक्स वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ते खरे अमेरिकन असल्यामुळेच प्रत्येक घटनेतून शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्याने म्हटले.

ट्रम्प या निवडणुकीत एक पाऊल मागे आहेत. त्यामुळे त्यांनी अमेरिकन नागरिकांसाठी काय करता येईल याचा विचार करून निर्णय घेण्याची गरज असल्याचेही ट्रम्प यांच्या मुलाने म्हटले आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, आजच्या वादविवादात क्लिंटन या १३ गुणांच्या आघाडीने विजयी ठरल्या. एकूण प्रेक्षकांपैकी ५२ टक्के लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला, तर ३९ टक्क्यांनी ट्रम्प यांना पसंती दिली. क्लिंटन यांनी तिन्ही ‘प्रेसिडेंशियल डिबेट्स’ जिंकल्या आहेत, मात्र तिसऱ्या फेरीतील त्यांच्या मतांची आघाडी सर्वात कमी होती. न्यूयॉर्कमधील पहिल्या वादात त्यांनी ३५ गुणांच्या, तर सेंट लुइस येथील दुसऱ्या वादात २३ गुणांच्या आघाडीसह विजय मिळवला होता.