रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील लोकशाही परंपरेत बसणारे नाहीत. लोकशाहीला त्यांच्यापासून धोका आहे, देशात पक्षभेद विसरून त्यांना सर्वानीच एकजुटीने विरोध केला आहे, असे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी सांगितले.
न्यू हॅम्पशायर येथे काल त्यांनी सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांच्यासमवेत सभा घेताना ट्रम्प यांच्यावर टीका केली. ट्रम्प यांना सर्वाचा विरोध आहे, त्यांनी केलेली विधाने कुणाला मान्य नाहीत, कारण त्यांनी निवडणुकीचा निकाल मान्य करण्यालाच नकार दिला आहे. महिलांची मानहानी करणारी विधानेही त्यांनी केली आहेत, असे त्या म्हणाल्या.
माजी परराष्ट्रमंत्री व अध्यक्षीय उमेदवार असलेल्या क्लिंटन यांनी सांगितले, की ट्रम्प यांनी लोकशाही परंपरेस न शोभणारे वर्तन केले आहे. ट्रम्प यांच्या न्यूजर्सी गोल्फ क्लब बाहेरची खोली ही भीतिदायक असल्याचे माजी कर्मचाऱ्याने म्हटले आहे. या समलिंगी कर्मचाऱ्याचा ट्रम्प यांनी शारीरिक व शाब्दिक छळ केला होता, त्यावर क्लिंटन यांनी भर दिला. साडेचार तासांच्या तीन चर्चात आपण ट्रम्प यांच्या समोरासमोर येऊन अध्यक्षीय निवडणूक लढवण्याची धमक आपल्यात असल्याचे दाखवून दिले, असे सांगून त्या म्हणाल्या, की ट्रम्प यांच्या रूपात अध्यक्षीय निवडणुकांचा निकाल स्वीकारणार नाही, असे सांगणारा उमेदवार लोकांपुढे आहे. निवडणुकात आम्ही हेराफेरी करीत आहोत व ट्रम्प समर्थकांवर हल्ले करीत आहोत, असे आरोप ते करीत आहेत ते निखालस खोटे असून मी ११२ देशांत फिरून आले आहे. अनेक देशांत राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकले जाते, विजनवासात पाठवले जाते, काहींना ठार केले जाते. अमेरिकेत असे चालणार नाही. सत्तेचे शांततामय हस्तांतर ही आमची परंपरा आहे. ती आम्ही गमावू शक णार नाही. ट्रम्प हे लोकशाही संस्था व मूल्यांवर हल्ले करीत सुटले आहेत. वॉरेन यांनी सांगितले, की ट्रम्प यांना सगळीकडे क्लिंटनच दिसत आहेत. ते अध्यक्षपदास कसे अपात्र आहेत हे आम्ही दाखवून दिले आहे.
ट्रम्प यांच्या अपमानास्पद टीकेचे बॉबी जिंदाल, निक्की हॅले, पत्रकार सोपान देबही धनी
अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यांचा अपमान केला, त्यात भारतीय वंशाचे अमेरिकी गव्हर्नर बॉबी जिंदाल व निक्की हॅले तसेच भारतीय वंशाच्या एका पत्रकाराचा समावेश आहे. द न्यूयॉर्क टाइम्सने ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारकाळात कुणाचा कोठे अपमान केला याची यादीच दिली आहे. ट्रम्प यांनी जूनमध्ये ट्विटरवरून विरोधकांची अपमान मालिका सुरू केली, त्यात त्यांनी अध्यक्षीय उमेदवार, पत्रकार, वृत्तसंस्था, देश यांचा अपमान केला. एकूण २८१ जणांचा ट्रम्प यांनी अवमान केला आहे. त्यात लुईझियानाचे माजी गव्हर्नर जिंदाल, दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हॅले, मूळ भारतीय पत्रकार सोपान देब यांचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 26, 2016 2:07 am