डोनाल्ड ट्रम्प यांची घोडदौड सुरूच, दोन राज्यात विजय
अमेरिकेतील अध्यक्षीय उमेदवारीसाठीच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे बेर्नी सँडर्स यांनी हिलरी क्लिंटन यांचा पश्चिम व्हर्जिनियात पराभव केला आहे. असे असले तरी त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळणे अजूनही सोपे नाही. रिपब्लिकन पक्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी दोन राज्यात बाजी मारली आहे.
व्हेरमाँटचे सिनेटर सँडर्स यांनी पश्चिम व्हर्जिनियात १५ टक्के अधिक मते घेऊन बाजी मारली. सँडर्स यांच्या विजयाने माजी परराष्ट्र मंत्री क्लिंटन यांची अध्यक्षीय उमेदवारीकडे सुरू असलेली वाटचाल खंडित होणार नाही, कारण क्लिंटन यांची आघाडी मोठी आहे. त्याचबरोबर सँडर्स यांच्या विजयाने क्लिंटन यांना देशाचे अध्यक्ष होणे सोपे नाही असे संकेत मिळत आहेत. सँडर्स यांनी १९ तर क्लिंटन यांनी २३ राज्ये जिंकली आहेत. क्लिंटन यांना उमेदवारीसाठी २३८३ प्रतिनिधी मतांची गरज आहे त्यासाठी त्यांना १४४ मते कमी आहेत. क्लिंटन यांना नेब्रास्का येथील प्राथमिक लढतीत विजय मिळाला असून तेथे त्यांना कुठलेही प्रतिनिधी मत मिळालेले नाही. ५ मार्चच्या प्राथमिक लढतीत सँडर्स यांना १५ तर क्लिंटन यांना १० प्रतिनिधी मते मिळाली होते. ओरेगॉन येथील सालेम येथे प्रचार सभेत सँडर्स यांनी सांगितले की, आम्ही आता १९ राज्यात विजय मिळवला आहे, त्यामुळे मला आशा निर्माण झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळण्याची अजून आशा आहे. असे असले तरी ते काम कठीण आहे. प्राथमिक लढतींच्या अखेरीपर्यंत मी लढत राहीन. उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणुकीच्यावेळी पक्षात एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न करीन. क्लिंटन यांच्याशी अनेक मतभेद असले तरी ट्रम्प यांचा पराभव करण्यावर आमचे मतैक्य आहे. रिपब्लिकन पक्षात ट्रम्प यांनी पश्चिम व्हर्जिनिया व नेब्रास्कात विजय संपादन करताना ११०७ प्रतिनिधी मते मिळवली आहेत. त्यांना आता उमेदवारीसाठी १३० मतांची गरज आहे. जुलैत त्यांची उमेदवारी जाहीर होईल. ट्रम्प यांनी सांगितले की, पश्चिम व्हर्जिनिया व नेब्रास्काचा मी आभारी आहे.