लाखो लोकांनी हिलरी क्लिंटन यांना बेकायदेशीरपणे केलेल्या मतदानामुळे लोकप्रिय मतात मला जास्त मते मिळू शकली नाहीत, असा आरोप अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. निवडणुकीनंतर क्लिंटन यांच्याबरोबरचा वाद संपल्याचे संकेत दिल्यानंतर आता ट्रम्प यांनी पुन्हा नव्याने टीका केल्याने क्लिंटन व ट्रम्प यांच्यातील संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या दाव्याचे समर्थन करताना कुठलेही पुरावे दिलेले नाहीत. ज्यांनी बेकायदेशीर मतदान केले त्यांची मते वगळली तर मला मिळालेल्या मतांचे प्रमाण जास्त राहिले असते असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ‘इलेक्टोरल कॉलेज’ची सर्वाधिक मते मला मिळाली पण लोकप्रिय मतात मी मागे पडलो कारण लाखो लोकांनी बेकायदेशीररीत्या मतदान केले व ती मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली होती, असा आरोप करताना ते म्हणाले की, व्हर्जिनिया, न्यूहॅम्पशायर व कॅलिफोर्निया या राज्यांत मतदानातील घोटाळ्यामुळे माझा पराभव झाला.  ‘इलेक्टोरल कॉलेज’ची भरपूर मते मिळवून ट्रम्प यांनी अध्यक्षपद पटकावले असले तरी लोकप्रिय मतात हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर २० लाख मतांची आघाडी घेतल्याचे दिसून आले असून कॅलिफोर्नियासह काही राज्यातील मतांचा मेळ घातला असता क्लिंटन यांची लोकप्रिय मतातील आघाडी पंचवीस लाख मतांच्या पुढे जाऊ शकते. क्लिंटन यांना इलेक्टोरल कॉलेजची २३२ मते मिळाली होती प्रत्यक्षात त्यांना २७० मतांची गरज होती. विस्कॉन्सिन राज्यात फेरमतमोजणी होत असताना ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर पुन्हा एकदा नवा आरोप केला आहे. विस्कॉन्सिनमधील फेरमतमोजणी हा निवडणूक घोटाळ्याचा भाग आहे असा आरोप ट्रम्प यांनी काल केला होता. अध्यक्षीय निवडणूक निकालाला आव्हान देण्यापेक्षा त्याचा सन्मान करणे योग्य ठरले असते असे ट्रम्प यांनी म्हटले होते. प्रसारमाध्यमांनी व्हर्जिनिया, न्यूहॅम्पशायर व कॅलिफोर्नियातील मतदार घोटाळ्याची दखल का घेतली नाही असा सवाल करीत त्यांनी प्रसारमाध्यमांवर पक्षपातीपणाचा आरोप केला.