अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक दिवसेंदिवस अधिकाधिक चुरशीची होत चालली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिन्टन यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पाच टक्के मतांनी आघाडी घेतल्याचे एका पाहणीवरून स्पष्ट झाले आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या या पाहणीच्या निष्कर्षांमुळे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजयाचा मार्ग खडतर असल्याचे बोलले जात आहे. क्लिन्टन यांना ४६ टक्के तर ट्रम्प यांना ४१ टक्के मतदारांचा पाठिंबा असल्याचे समोर आले आहे. त्यापाठोपाठ गॅरी जॉन्सन यांना नऊ टक्के आणि ग्रीन पार्टीचे जील स्टेइन यांना दोन टक्के मतदारांचा पाठिंबा आहे, असे वॉशिंग्टन पोस्ट-एबीसी न्यूजने म्हटले आहे. नोंदणीकृत मतदारांमध्ये क्लिन्टन या ट्रम्प यांच्यापेक्षा १० टक्के मतांनी आघाडीवर आहेत. क्लिन्टन यांना ४५ टक्के तर ट्रम्प यांना ३५ टक्के मते आहेत. काही राज्यांमध्ये क्लिन्टन आणि ट्रम्प यांच्यातील मतांचा फरक कमी होत चालला असल्याचे निदर्शनास येत असतानाच पाहणी अहवाल समोर आला आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा विजयाचा मार्ग खडतर असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

अन्य एका पाहणीनुसार, या दोन्ही नेत्यांमध्ये चार राज्यांत चुरशीची लढत होणार असून अरिझोना, जॉर्जिया, न्यू हॅम्पशायर आणि नेवाडा अशी त्यांची नावे आहेत. अरिझोना, न्यू हॅम्पशायर आणि नेवाडा येथे क्लिन्टन या ट्रम्प यांच्यापेक्षा केवळ एक टक्का मतांनी आघाडीवर आहेत, असे एनबीसी न्यूज-वॉल स्ट्रीय जर्नल-मॅरिस्ट पोलने म्हटले आहे. तर जॉर्जियामध्ये ट्रम्प तीन टक्क्यांनी आघाडीवर आहेत.