आज कॅलिफोर्नियासह महत्त्वाच्या लढती

डेमोक्रॅटिक पक्षाची अध्यक्षपदाची उमेदवारी हिलरी क्लिंटन यांना मिळणे आता जवळपास निश्चित झाले आहे. कॅलिफोर्नियातील महत्त्वाच्या लढतीपूर्वी त्यांनी बर्नी सँडर्स यांच्यावर अमेरिकेतील व्हर्जिन आयलंड्स व प्युटरे रिको येथे त्यांनी विजय मिळवला. माजी परराष्ट्रमंत्री असलेल्या क्लिंटन यांना उद्या (मंगळवारी) बहुराज्यीय लढतीत कॅलिफोर्नियासह सहा राज्यांत लढत द्यावी लागणार आहे. हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार समितीचे अध्यक्ष जॉन पोडेस्टा यांनी सांगितले, की आम्ही मंगळवारी रात्री पुरेशी प्रतिनिधी मते मिळवलेली असतील व पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांना उमेदवारी मिळेल अशी खात्री आहे. क्लिंटन यांना सध्या २३५४ प्रतिनिधी मते आहेत. त्यांना २३८२ मतांची आवश्यकता असून, एकूण २८ मते कमी आहेत. ती मिळाली तर त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार ठरणार आहेत. कॅलिफोर्नियातील निवडणूक महत्त्वाची असून, सँडर्स यांना १५६५ मते आहेत तर कॅलिफोर्नियात एकूण ५४६ प्रतिनिधी मते आहेत. मोंटाना, न्यूजर्सी, नॉर्थ डाकोटा, न्यू मेक्सिको व साऊथ डाकोटा या राज्यातही प्रायमरीजच्या लढती होत आहेत. पोडेस्टा यांनी सांगितले, की क्लिंटन यांना पुरेशी प्रतिनिधी मते मिळतील, आम्ही पक्षाची एकजूट करून दाखवू, कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा धोका आम्हाला परतवून लावायचा आहे. गेले बरेच दिवस लोक केवळ ट्रम्प यांना बघायला येतात, पण ट्रम्प हे अध्यक्षपदासाठी योग्य आहेत असे लोकांना वाटत नाही.