डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार हिलरी क्लिंटन यांना न्यूमोनिया झाला असून ९/११ हल्ल्याच्या पंधराव्या स्मृतिदिन कार्यक्रमास त्या गेल्या होत्या, त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना कॅलिफोर्नियाचा दौरा रद्द करावा लागला. क्लिंटन यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. मॅनहटन येथे ग्राउंड झिरो स्मारकाच्या ठिकाणाहून त्या काल अचानक निघून गेल्या. त्यांच्या डॉक्टर लिसा बारडॅक यांनी सांगितले की, त्यांना कफाशी संबंधित अॅलर्जी झाली आहे. त्यांना न्यूमोनिया झाला असून प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स देण्यात आली आहेत. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम बदलण्यात येत आहे. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे.
क्लिंटन यांच्या प्रचारकांनी सांगितले की, क्लिंटन या सोमवार किंवा मंगळवारी कॅलिफोर्नियाला जाणार होत्या पण त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे, असे त्यांचे प्रवक्ते निक मेरिल यांनी सांगितले. मेरील यांनी सांगितले की, न्यूयॉर्कमधील त्यांच्या निवासस्थानी त्या परत आल्या असून नंतर विश्रांती घेत आहेत.
निधी उभारणीसाठी क्लिंटन कॅलिफोर्नियाला जाणार होत्या. क्लिंटन या २००१ मधील हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या स्मारक ठिकाणी श्रद्धांजलीसाठी गेल्या असता त्यांना अचानक अंग गरम वाटले व नंतर त्यांना त्यांची कन्या चेलसा हिच्या घरी नेण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये सध्या तापमान व आद्र्रता जास्त आहे. ट्विटरवर टाकण्यात आलेल्या व्हिडिओनुसार क्लिंटन यांना चालताही येत नव्हते. त्यांचे पाय वाकत होते. त्यांचे कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांना उचलून मोटारीत ठेवले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 13, 2016 1:58 am