न्यूमोनियाने आजारी असल्याने तूर्त विश्रांती

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन या न्यूमोनियाने आजारी असल्याचे निदान झाल्यानंतर आता त्या गुरुवारी पुन्हा प्रचाराची मोहीम पुढे सुरू करणार आहेत. त्यांच्या प्रचार व्यवस्थापकांनी सांगितले, की हिलरी क्लिंटन या उत्तर कॅरोलिनात ग्रीनबोरो येथे अमेरिकेला बलशाली देश करण्यासाठी त्यांच्या कल्पना मांडणार आहेत. त्यांनी अलीकडेच फिलाडेल्फिया येथे बराक

ओबामा यांनी केलेले भाषण पाहिले. काही दूरध्वनी केले, तसेच काही मुद्दय़ांवर माहिती घेतली, असे त्यांचे प्रवक्ते निक मेरील यांनी सीएनएनला सांगितले.

क्लिंटन यांना गेल्या शुक्रवारी न्यूमोनियाचे निदान झाले असून, त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता, पण त्यांनी आता प्रचार मोहीम पुन्हा सुरू करण्याचे ठरवले आहे. रविवारी त्या ९/११ हल्ल्याच्या ग्राऊंड झिरो येथील स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात आजारी पडल्या असता त्यांना उचलून मोटारीत ठेवण्यात आल्याची दृश्यचित्रफीत प्रसारित करण्यात आली होती. त्या आजारी पडल्याने त्यांचा कॅलिफोर्नियाचा दौरा रद्द करण्यात आला होता.

येत्या ८ नोव्हेंबरला अध्यक्षीय निवडणूक होत असून, तोपर्यंत त्यांची प्रकृती कशी राहील याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  प्रतिस्पर्धी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यानंतर क्लिंटन या नेहमीच आजारी असतात व त्या यापूर्वीही अनेकदा चक्कर येऊन पडल्या आहेत असा आरोप केला आहे. राजकीय विरोधकांनी क्लिंटन यांच्या आजारपणावरही राजकारण केले आहे.

जागतिक घडामोडींमध्ये भारताची भूमिका महत्वाची

नजीकच्या भविष्यात जागतिक घडामोडीत भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिन्टन यांचे मत असल्याचे जैन समाजाचे धार्मिक नेते आचार्य लोकेश मुनी यांनी सांगितले. लोकेश मुनी यांनी क्लिन्टन यांची अलीकडेच भेट घेतली होती. नजीकच्या भविष्यात भारत जागतिक घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो आणि त्यामध्ये धार्मिक नेत्यांचीही महत्त्वाची भूमिका असेल असे क्लिन्टन यांनी म्हटल्याचे मुनी यांनी सांगितले. मुनी यांच्या नेतृत्वाखालील जैन समाजाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने अलीकडेच अमेरिकेचा दौरा केला त्या वेळी क्लिन्टन यांनी वरील मत व्यक्त केले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ करण्यास क्लिन्टन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.