अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी डेमोक्रेटिक पक्षातील आवश्यक २,३८३ मते हिलरी क्लिंटन यांनी मंगळवारीच मिळवली असतानाच बुधवारी कॅलिफोर्नियातील लढतीतही त्यांनी आपले पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांना पराभूत केले आहे. त्यामुळे अमेरिकन अध्यक्षपदासाठी त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असली तरी सँडर्स यांनी लढतीतून माघार न घेण्याचे जाहीर केले असल्याने जुलैत पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेतच उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याचा उपचार बाकी आहे.
क्लिंटन यांच्या उमेदवारीवर जुलैत शिक्कामोर्तब झाले तर अमेरिकेत निवडणुकीच्या राजकारणात अध्यक्षीय उमेदवारी खेचून आणणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरणार आहेत.
कॅलिफोर्नियात क्लिंटन यांना ५६ टक्के तर सँडर्स यांना ४३ टक्के मते पडली. क्लिंटन या न्यूजर्सी, न्यू मेक्सिको आणि दक्षिण डाकोटातही जिंकल्या आहेत. सँडर्स यांच्यावर उमेदवारी मागे घेण्याचा दबाव वाढत असला तरी पुढील मंगळवारच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्धार त्यांनी बुधवारी चाहत्यांसमोर व्यक्त केला. वॉशिंग्टनमधील प्राथमिक लढतीत तसेच फिलाडेल्फियामध्येही ते लढत देणार आहेत.
भारावलेल्या शब्दांत समर्थकांचे आभार मानताना क्लिंटन यांनी न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथे सांगितले, की कॅलिफोर्नियातील विजयाने मैलाचा दगड आता गाठला गेला आहे. त्याबद्दल मी सर्वाची आभारी आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी क्लिंटन यांचे अभिनंदन केले असले तरी औपचारिकरीत्या त्यांच्या उमेदवारीला मान्यता दिलेली नाही.