करोनाच्या संसर्गाने देशात पुन्हा एकदा उचल धरली आहे. यामागे नागरिक कोविड-१९ च्या प्रोटोकॉलचे पालन करत नसल्याचे प्रमुख कारण आहे. करोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरणे ही प्राथमिक खबरदारी असतानाही लोक याकडेही दुर्लक्ष करत आहेत. वारंवार जनजागृती करुनही या नियमाचा भंग होत असल्याने आता हिमाचल प्रदेश या राज्याने याविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, जर कोणी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास त्याला थेट अटक करण्याचे आदेश सरकारने पोलिसांना दिले आहेत.

“कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास तिला कुठल्याही वॉरंटशिवाय अटक करण्यात येईल, तसेच या गुन्ह्याबद्दल आठ दिवसांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल किंवा ५००० रुपयांचा दंड आकारण्यात येईल,” अशी माहिती सिरमौरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.

अनेक राज्ये सध्या नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी नेहमी मास्क वापरावा यासाठी विविध पावलं उचलतं आहेत. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे. त्यानुसार, नुकतेच दिल्ली सरकारने देखील जर कोणी विनामास्क आढळल्यास त्याला ५०० रुपयांऐवजी २००० रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. दिल्लीच्या प्रशासनाने याची कडक अंमलबजावणी करण्यासही सुरुवात केली आहे. यामुळे विनामास्क फिरणाऱ्या लोकांमध्ये आणि नागरी संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेकदा वादावादी होतानाही पहायला मिळत आहे.

तसेच राजस्थानमध्ये सरकारने आठ जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला आहे. रात्री ८ ते सकाळी ६ या कालावधीमध्ये या जिल्ह्यांमध्ये कोणालाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशानुसार, जयपूर, जोधपूर, कोटा, बिकानेर, उदयपूर, अजमेर, अलवार आणि भिलवाडा या आठ जिल्यांमध्ये संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच बाजार, रेस्तराँ, शॉपिंग मॉल्स आणि इतर व्यावसायिक ठिकाणं उघडी राहणार आहेत.