करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशाच्या वेगवेगळया भागात अजूनही लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजेस सुरु झालेले नाहीत. शाळा, कॉलेजेस बंद असल्यामुळे अनेक शिक्षण संस्थांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला आहे. ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन दिले जातं आहे. पण सर्वांनाच हा पर्याय परवडत नाहीय. त्याचेच एक उदहारण हिमाचल प्रदेशमध्ये समोर आले आहे.

कांगडा जिल्ह्यातील ज्वालामुखी येथे राहणाऱ्या कुलदीप कुमार यांना मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी चक्क आपली गाय विकावी लागली. मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल फोन विकत घेण्यासाठी त्यांनी आपली गाय विकली. ही गायच त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन होते. कुलदीप कुमार यांची दोन मुले चौथ्या आणि दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेत आहेत.

मार्च महिन्यात शाळा बंद झाल्या. स्मार्टफोन अभावी मुलांना अभ्यासात अडचणी येत होत्या. करोना व्हायरसमुळे लॉकडाउन झाल्यानंतर शाळा ऑनलाइन सुरु झाल्या. मुलांना ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहता यावे, यासाठी स्मार्टफोन विकत घेण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. ‘द ट्रीब्युन’ने हे वृत्त दिले आहे.

कुलदीपने बँक आणि जमीनदाराकडून सहा हजार रुपयाचे कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला. पण गरीब आर्थिक स्थितीमुळे कोणीही त्याला मदत केली नाही. अखेरीस फक्त सहा हजार रुपयांसाठी त्याला उत्पन्नाचे एकमेव साधन असलेली आपली गाय विकावी लागली. त्या पैशातून त्याने मुलांच्या शिक्षणासाठी स्मार्टफोन घेतला. ज्वालामुखी येथे छोटयाशा झोपडीत कुलदीप त्याची पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. आर्थिक मदतीसाठी तो पंचायतीकडे अनेक वेळा गेला पण कोणीही त्याला मदत केली नाही असे कुलदीपने ट्रीब्युनशी बोलताना सांगितले.