निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार, हिमाचल प्रदेशातील एकूण ६८ जागांसाठी ९ नोव्हेंबरला मतदान  होणार आहे. तर याठिकाणी १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. आजपासूनच येथे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच गुजरामध्ये होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येणार आहे. गुजरातमधील १८२ जागांसाठी १८ डिसेंबरपूर्वी मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती, निवडणुक आयुक्त ओमप्रकाश रावत आणि निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली.

या निवडणूक कार्यक्रमांमध्ये काही नव्या गोष्टींचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यानुसार, हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांमध्ये ७५२१ मतदान केंद्रांवर व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) जोडलेल्या ईव्हीएम बसवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व मतदान केंद्रांवर चित्रीकरणही होणार आहे.

गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशमध्ये ४ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. तर २० डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाले होते. हिमाचल प्रदेशात एकूण ६८ जागांपैकी ३६ जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता. तर भाजपला २६ जागा मिळाल्या होत्या. वीरभद्र सिंह येथे सहा वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.

दरम्यान, गुजरातमध्ये विधानसभेचा कार्यकाळ जानेवारी महिन्यातील तिसऱ्या आठवड्यांत संपणार आहे. त्यामुळे लवकरच येथील निवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्यात येतील. येथील ५० हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रांवरदेखील यावेळी VVPAT सहित ईव्हीएम बसवण्यात येणार आहेत. या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत वापर करण्यात आला होता.