गेल्या महिन्यांत हिमाचल प्रदेशातील किन्नोर-तिबेट सीमेवर हिमस्खलनात गाडले गेल्याने सहा जवान ठार झाले होते. मात्र, त्यांचे मृतदेह बर्फाच्या थरातून बाहेर काढण्यात लष्कराला अनेक अडचणी येत होत्या. आजवर टप्प्याटप्प्याने यातील ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर अखेर आज (दि.१४) २३ दिवसांनंतर या दुर्घटनेतील उर्वरित २ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यामुळे ही बचाव मोहिम आता संपली आहे.


भारत-चीन सीमेवरील शिपकला भागानजीक किन्नोरमधील नामग्या येथे २० फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ च्या सुमारास १६ जवान गस्त घालत असताना एक बर्फाचा डोंगर त्यांच्या अंगावर कोसळला. यामध्ये ६ जवान ठार झाले होते हे सर्व जवान जम्मू-काश्‍मीर रायफल्सचे होते. यातील एका जवानाचा मृतदेह घटनेच्या दिवशीच सापडला होता.

त्यानंतर पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने इतर तीन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले होते. दरम्यान, आज २३ व्या दिवशी उर्वरित २ मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. जोपर्यंत सर्व जावानांचे मृतदेह सापडत नाहीत तोपर्यंत ही बचाव मोहित न थांबवण्याचा निर्णय लष्कराकडून घेण्यात आला होता. मात्र, आता सर्व ६ जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याने हे बचाव कार्य थांबवण्यात आले आहे.