News Flash

भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसाठी रशियावरुन मागवलं हेलिकॉप्टर; तासाचं भाडं ५ लाख १० हजार रुपये

रशियन कंपनीसोबत सरकारने केला करार

फाइल फोटो (विकिपिडियावरुन साभार)

हिमाचल प्रदेशमधील भाजपाचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर (CM Jairam Thakur) यांना पुढील महिन्यापासून नवीन हेलिकॉप्टर मिळणार आहे. हिमाचल प्रदेश सरकारला पुढील महिन्यात या नव्या हेलिकॉप्टरचा ताबा मिळणार आहे. रशियावरुन हे नवीन हेलिकॉप्टर दिल्लीत दाखल झाल्याचं वृत्त न्यूज १८ नं दिलं असून सध्या त्याच्या चाचण्या सुरु आहेत. डीसीसीएने हे हेलिकॉप्टर देण्यासाठी परवानगी दिल्यानंतर ठाकुर यांना ते वापरता येणार आहे. विशेष म्हणजे हे हेलिकॉप्टर भाडेतत्वावर घेण्यात आलं असून त्याचं तासाचं भाडं ५ लाख १० हजार रुपये इतकं आहे. यावरुन आता काँग्रेसने हिमालचल प्रदेश सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारं हे हेलिकॉप्टर सध्या सरकारने भाड्यावर घेतलेल्या हेलिकॉप्टरपैकी एक आहे. सध्या तासभरासाठी हे हेलिकॉप्टर वापरल्यास सरकारी तिजोरीमधून दोन लाख रुपये खर्च होतात. स्काय वन कंपनीच्या या एमआय १७१ ए २ प्रकाराच्या हेलिकॉप्टरची आसन क्षमता २४ इतकी आहे. सध्या हिमाचलचे मुख्यमंत्री वापरत असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये सहा व्यक्तीच बसू शकतात. जास्त आसन क्षमता असल्यानेच या हेलिकॉप्टरचं भाडं अधिक आहे. यासंदर्भात काँग्रेसचे हिमाचलमधील प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या कुलदीप सिंह राठोड यांनी टीका केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारवर कर्जाचा डोंगर असताना दुसरीकडे मुख्यमंत्री आरामदायक हेलिकॉप्टर आणि इतर खर्च करण्यात व्यस्त आहेत. सरकारच्या या अशा वायफळ खर्चांमुळे हिमाचल प्रदेशची परिस्थिती बिकट होत चालल्याचा टोला राठोड यांनी लगावला आहे.

नवीन हेलिकॉप्टर हे पाच वर्षांच्या कराराअंतर्ग घेण्यात येणार आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागने कंपनीसोबत यासंदर्भातील करार केला आहे. यापूर्वी पवन हंस कंपनीचे हेलिकॉप्टर भाडेतत्वावर सरकारने घेतलं होतं. मात्र तो करार नुकताच संपुष्टात आला. डीसीसीएकडून या हेलिकॉप्टरच्या वापराला हिरवा कंदील देण्यात आल्यानंतर हे हेलिकॉप्टर मुख्यमंत्र्यांच्या सवेते रुजू होईल. हे हेलिकॉप्टर मुख्यमंत्री त्यांच्या दौऱ्यांसाठी वापरतील. तसेच बर्फाळ प्रदेशातील लोकांपर्यंत हिवाळ्यामध्ये सेवा पोहचवण्यासाठीही या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येईल. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीच्या काळातही याचा वापर केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे एवढ्या महाग हेलिकॉप्टरची मुख्यमंत्र्यांना सध्या काय गरज आहे अशाप्रकारचे प्रश्न सोशल नेटवर्किंगवरुन उपस्थित केले जात आहेत. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. मात्र असं असतानाही एवढा खर्च करुन हेलिकॉप्टरची सेवा का घेण्यात आली हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यापूर्वी हिमाचल प्रदेश सरकारने महागड्या गाड्याही खरेदी केल्या होत्या. त्या मुद्द्यावरुनची चांगलाच वाद निर्माण झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 11:51 am

Web Title: himachal pradesh cm jairam thakur will get new helicopter scsg 91
Next Stories
1 आईच्या मृत्यूमुळे दु:खाचा डोंगर, तरीही अंत्यसंस्कारानंतर काही तासातच कामावर हजर; डॉक्टर मुलांनी जिंकलं मन
2 सक्तीचा लॉकडाउन योगी सरकारला अमान्य; सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका
3 रुग्णवाढीबरोबर मृत्यूचं तांडव! २४ तासांत १,७६१ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X