हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे साम्राज्य खालसा करत भाजपने सत्ता मिळवली असली तरी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाला आहे. ‘वैयक्तिक पराभवापेक्षा पक्षाचा विजय महत्त्वाचा असतो. माझा पराभव होईल असे मला वाटले नव्हते. मी या पराभवाचा आढावा घेईन’, असे त्यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशमध्ये ६८ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. हिमाचलमध्येही सोमवारी मतमोजणी झाली. यात भाजपने ४४ जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसला फक्त २१ जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसचा पराभव झाल्याने भाजपच्या गोटात उत्साह असला तरी दुसरीकडे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा दारुण पराभव झाला. धुमल हे हिमाचलच्या सुजनपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र त्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार रजिंदर राणा यांनी धुमल यांचा पराभव केला. ‘जनतेचा काँग्रेसवरील विश्वास या निकालातून दिसून येतो. या विजयासाठी मी जनतेचा आभारी आहे. सुजनपूरमधील जनतेची सेवा करत राहणार, असे आश्वासन रजिंदर राणा यांनी दिले आहे.

दुसरीकडे प्रेमकुमार धुमल यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली. वैयक्तिक विजयापेक्षा पक्षाचा विजय महत्त्वाचा असतो. हिमाचलच्या जनतेने भाजपवर विश्वास दाखवला, यासाठी मी जनतेचा आभारी आहे. या पराभवाची नेमकी कारणे काय असावीत याचा आढावा घेऊ असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील या निकालावर प्रतिक्रिया दिली. प्रेम कुमार धुमल यांच्या पराभवाचे दुःख वाटते, पण जनतेने पक्षाला निवडून दिले याचे आनंदही आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हिमाचल प्रदेशात सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना होता. हिमाचलची जनता दर पाच वर्षांनी सत्ताबदल करते असा गेल्या दोन-अडीच दशकांचा तेथील अनुभव आहे. अपेक्षेनुसार यंदा भाजपला संधी होती. सत्ताधारी काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे भाजपचे पारडे जड मानले जात होते. सोमवारच्या निकालातही अपेक्षेप्रमाणे भाजपनेच बाजी मारली. मात्र, ७३ वर्षीय धुमल यांच्या पराभवामुळे भाजपच्या यशाला गालबोट लागले.