हिमाचल प्रदेशमधील  कुल्लू पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहीम हाती घेतली आहे. याच मोहीमेअंतर्गत पोलिसांनी मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी जिल्ह्यामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त केलाय. पोलिसांनी बंजार येथील श्रीकोट पचायतीमधील शिजाहू गावातून तब्बल १११ किलो चरस जप्त केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन महिलांनादोघांना अटक केली आहे. इतकच नाही तर पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्याने संपूर्ण शिजाहू गावच सील केलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना या गावामध्ये एक चरस माफिया असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी या अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी एका पुरुषासहीत महिलेलाही अटक केली आहे. या दोघांविरोधात एनडीपीएस अ‍ॅक्टच्या (अमली पदार्थविरोधी कायदा) २० व्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात कुल्लूचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारस यासंदर्भातील माहिती दिली. बंजारचे पोलीस उपाधीक्षक बिन्नी मिन्हास यांच्या नेतृत्वाखाली बंजार पोलिसांनी ही करावाई केली. यापूर्वीही बंजार पोलिसांनी अशाप्रकारची कारवाई केली असली तर यंदा सापडलेला साठा हा अंमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा आहे. मागील वर्षीही बंजार पोलिसांनी ४२ किलो चरस जप्त केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं होतं. कुल्लू पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून या अंतर्गत आतापर्यंत अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. कारवाई केल्यानंतर या अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांच्या संपत्तीसंदर्भातील तपासही केला जात असून आतापर्यंत कुल्लू पोलिसांनी तीन कोटींची बेकायदेशीर संपत्ती जप्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अद्याप दोन जणांना अटक केली असून तपास सुरु असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

बहुतांश भाग डोंगराळ असणाऱ्या हिमाचल प्रदेशमध्ये अनेक परदेशी पर्यटक येत असतात. त्याचबरोबरच येथे भारताच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात. म्हणूनच येते मोठ्य प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवसाय छुप्या पद्धतीने चालतो. याचविरोधात आता पोलिसांनी कंबर कसली असून मागील काही आठवड्यांपासून अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे मारले आहेत.