पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री झालेल्या भीषण चकमकीनंतर आता हिमाचल प्रदेशमध्ये चीनला लागून असलेल्या भारतीय सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. गलवान खोऱ्यातील या चकमकीमध्ये कर्नलसह २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. चीनच्या बाजूलाही जिवीतहानी झाली आहे.

भारताने इंटरसेप्ट केलेल्या मेसेजनुसार त्यांचे ४३ सैनिक ठार तसेच गंभीर झाले आहेत. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सीमावर्ती भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश पोलिसांनी सर्व गुप्तचर यंत्रणांना सक्रिय केले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

लाहौल, स्पिती आणि किनौर जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हिमाचल पोलीस आणि इंडो-तिबेटीयन पोलीस या भागांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. या तीन जिल्ह्यांमध्ये भारताची सीमा चीनला लागून आहे.