Himachal Pradesh हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला Assembly Election 2017 सुरुवात झाली आहे. हिमाचल प्रदेशातील सर्व ६८ जागांसाठी मतदान होत असून सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार लढत पाहायला मिळते आहे. हिमाचल प्रदेशात ६२ आमदारांसह एकूण ३३७ उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री वीरभद्र सिंह, १० मंत्री, आठ मुख्य संसदीय सचिव, विधानसभेचे उपाध्यक्ष जगत सिंह नेगी, माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल आणि डझनभर माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह विरुद्ध भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार धूमल असा संघर्ष हिमाचल प्रदेशात पाहायला मिळत आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत असून १८ डिसेंबरला मतमोजणी होईल. हिमाचल प्रदेशात ४९.०५ लाख मतदार आहेत. त्यामध्ये २० हजार नवमतदारांचा समावेश आहे. राज्यात ७ हजार ५२१ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर होत आहे.

सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. त्यामुळेच भाजप आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकांनी राज्यात ४५० हून अधिक रॅली केल्या आहेत. राज्यात भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या ७, तर पक्षाध्यक्ष अमित शहांच्या ६ सभा झाल्या आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी ३ जनसभांना संबोधित केले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन काँग्रेस सरकारला घेरल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर काँग्रेसने नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीवरुन भाजपवर टीकेची झोड उठवली.