इंग्रजी, चिनी व हिंदी या भाषा येत्या काळात डिजिटल जगावर राज्य करतील, असे भाष्य करतानाच, जगातील भाषांची बाजारपेठ मोठी असून कंपन्या लवकरात लवकर भाषांचे अ‍ॅप्स तयार करून त्यांचा फायदा घेऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.
दहाव्या जागतिक हिंदी संमेलनाचे पंतप्रधानांनी येथील लाल परेड मैदानावर उद्घाटन केले. लुप्तप्राय होत असलेल्या भाषांचे संवर्धन करण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन करतानाच, जगभरातील ६ हजार भाषांपैकी ९० टक्के भाषांना ‘भूतकाळातील अवशेष’ होण्याचा धोका असल्याची चिंता विद्वानांनी व्यक्त केली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हिंदीचे महत्त्व आणि तिला समृद्ध करण्याची आवश्यकता यावर भर देऊन मोदी म्हणाले की, आपण हिंदीला विसरलो, तर ते देशाचे नुकसान असेल. माझी मातृभाषा गुजराती असली, तरी कधीकधी मी विचार करतो की, मला हिंदी
येत नसती तर काय झाले असते? कुठल्याही भाषेचे ज्ञान असण्यातील ताकद मला माहीत आहे.
तथापि, केवळ हिंदीलाच नव्हे, तर लुप्तप्राय होत चाललेल्या भाषांना प्रोत्साहन देण्यावर आपण लक्ष
केंद्रित करायला हवे, असे त्यांनी सांगितले.
आगामी काळात इंग्रजी, चिनी व हिंदी या तीन भाषा डिजिटल जगतात प्रभावी राहतील. अशात आपण आपल्या भाषांचे रक्षण व संवर्धन केले नाही, तर त्या मरतील, अस्तंगत होतील आणि डायनॉसॉर कसा होता हे पाहण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहावा लागतो तसे त्यांच्या बाबतीत होईल, असा सावधगिरीचा इशारा मोदी यांनी दिला.