केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी हिंदी दिनानिमित्त केलेल्या वक्तव्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात असल्याने तीच देशाला एकसंध ठेवू शकते असं म्हणत त्यांनी ‘एक देश, एक भाषा’चे संकेत दिले. शाह यांच्या विधानाचे दक्षिणेकडील राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या कमल हासन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ ट्विट करत शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

”१९५० मध्ये विविधतेत एकता या वचनासोबत भारत प्रजासत्ताक झाला. प्रत्येक भाषा आणि संस्कृतीचा आदर केला जाईल आणि त्यांची सुरक्षितता अबाधित राखली जाईल असं आश्वासन जनतेला देण्यात आलं होतं. आता कोणी शाह, सुलतान किंवा सम्राट आमचा हा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. देशातील लोकांवर कोणतीही एक भाषा थोपवली जाऊ शकत नाही आणि जर असं झाल्यास तर मोठं आंदोलन होईल,” अशा शब्दांत हासन यांनी संताप व्यक्त केला.

देशाच्या एकतेसाठी अनेक राजकीय नेत्यांनी प्राणाचा त्याग केला. लोक आपली भाषा, संस्कृती, ओळख विसरू शकत नाहीत. तुम्ही कोणावर एखादी गोष्ट लादू शकत नाही, असं ते म्हणाले. याशिवाय नवीन कायदा लागू करण्याआधी सामान्यांशी चर्चा केली पाहिजे. जलीकट्टूसाठी जे झाले ते फक्त प्रदर्शन होते. मात्र भाषा वाचवण्यासाठी त्यापेक्षा मोठं आंदोलन होईल, असा इशाराही हासन यांनी दिला आहे.

शाह यांच्या हिंदीबाबतच्या वक्तव्यावरून कर्नाटकमध्येही राजकीय वादळ उठले आहे. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने शाह यांच्या वक्तव्याचे वर्णन ‘भाषेची सक्ती’ असे केले आहे. तथापि, सत्ताधारी भाजपने मात्र कानडी भाषेप्रमाणेच हिंदूी शिकण्याचे आणि शहा यांच्या वक्तव्याला हिंदीची सक्ती समजू नये, अशी सारवासारव केली आहे.