देशभर हिंदी हीच एक राष्ट्रभाषा असावी, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावरून सोमवारीही तीव्र पडसाद उमटले असून भाजपचे कर्नाटकातील मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासह अनेक दाक्षिणात्य नेत्यांनी निषेधाचा सूर आळवला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा म्हणाले की, ‘‘कर्नाटकात कन्नड हीच मुख्य भाषा राहील आणि त्यात तडजोड केली जाणार नाही. देशाच्या पातळीवर सर्वच अधिकृत भाषा या समान आहेत, पण कर्नाटकापुरते बोलायचे तर इथे कन्नडचे महत्त्व अबाधित राहील.’’ माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी शहा हे एखाद्या घरभेद्यासारखे भाषेच्या मुद्दय़ावरून समाजात तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप केला आहे.

तामिळनाडूतील ‘मक्कल निधी मैयम’चे संस्थापक आणि अभिनेते कमल हासन म्हणाले की, ‘‘देशाच्या बहुविधतेतील एकतेवर कोणी शहा, सुल्तान आणि सम्राटाला आघात करण्याचा हक्क नाही. आम्ही सर्वच भाषांचा आदर करतो, पण आमची मातृभाषा तामिळच राहील.’’ भाषेवरून देशात यादवी माजणे हे कुणालाच परवडणारे नाही, असेही त्यांनी सांगितले.

द्रमुकचे आंदोलन :  हिंदी सक्तीच्या विचाराविरोधात तामिळनाडूत २० सप्टेंबरला राज्यव्यापी निदर्शने होणार आहेत. द्रमुकच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला.

हे दौर्बल्य नव्हे!

अनेक भाषा हे भारताचे दौर्बल्य नव्हे, असे नमूद करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २३ भारतीय भाषांचा उल्लेख केला आहे. त्रिभाषा सूत्राचा निर्णय घटनाकारांनी पूर्वीच केला असून त्याला धक्का लावू नये, असेही गांधी यांनी ‘ट्वीट’मध्ये म्हटले आहे.