हिंदी ही देशाला एकसंध ठेवणारी भाषा आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी या भाषेला प्रशस्ती दिली. हिंदी भाषा दिवसानिमित्त येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदीसह देशातील सर्व प्रादेशिक भाषांच्या वृद्धीसाठी प्रोत्साहन द्यायला हवे, असे ते म्हणाले.
विविध मंत्रालये, राष्ट्रीय बँका तसेच सरकारी खात्यांमध्ये हिंदीचा योग्य व अधिकाधिक वापर करणाऱ्यांना राजभाषा पुरस्काराने गौरविण्यात येते. राष्ट्रपतींच्या हस्ते  या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ते म्हणाले, हिंदी ही देशातील सर्वसामान्य माणसांची भाषा आहे. या भाषेत देशाला एकसंध ठेवण्याची ताकद आहे. सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना हिंदीच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात. हिंदीच्या तसेच सर्व प्रादेशिक भाषांच्या संवर्धनासाठी आपण प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे त्यांनी आवाहन केले.