कृष्णमूर्ती फाऊंडेशन इंडियाचे विश्वस्त आणि प्रसिद्ध हिंदी साहित्यिक प्रा. कृष्णनाथ यांचे बेंगलुरू स्थित कृष्णमूर्ती अध्ययन केंद्रात निधन झाले. काशी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विद्यार्थिप्रिय असलेल्या कृष्णनाथ यांनी लिहिलेले ‘इम्पॅक्ट ऑफ फॉरेन एड ऑन इंडियाज फॉरेन पॉलिसी’ हा ग्रंथ बहुचर्चित झाला होता.
त्यांचा जन्म १९३४ साली काशीतील एका स्वातंत्र्य सैनिकी कुटुंबात झाला. बनारस हिंदू विश्वविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी मिळवल्यानंतर ते समाजवादी चळवळीशी जोडले गेले आणि अनेक जन-आंदोलनात भाग घेऊन त्यांनी तुरुंगवास सोसला. हैदराबादमध्ये राहून त्यांनी प्रतिष्ठित साहित्यिक नियतकालिक ‘कल्पना’ तसेच इंग्रजी नियतकालिक ‘मॅनकाइंड’चे संपादन केले. बौद्ध तत्त्वज्ञानाकडे विशेष रूपाने आकृष्ट झाल्याने भारतीय आणि प्रवासी तिबेटी आचार्यासमवेत बसून त्यांचा नागार्जुनाचे माध्यमिक तत्त्वज्ञान तसेच वज्रयानाचा अभ्यास सुरू झाला. ऐंशीच्या दशकात जगप्रसिद्ध तत्त्वचिंतक जे. कृष्णमूर्तीच्या बरोबर बौद्ध पंडितांचे प्रदीर्घ चर्चासत्र चालले होते. कृष्णनाथजी या बौद्ध पंडितांपैकी एक होते. नव्वदच्या दशकापासून ते दरवर्षी काही महिने दक्षिण भारतात घालवत असत. बहुत करून बेंगलुरूच्या जवळ असलेल्या हरिद्वनम येथील कृष्णमूर्ती अध्ययन केंद्रात त्यांचा एकान्त प्रवास चालत असे. या दरम्यान ते कृष्णमूर्ती फाऊंडेशनचे हिंदी नियतकालिक ‘परिसंवाद’चे पण संपादन करीत असत. त्यांच्या हिंदीत प्रकाशित झालेल्या साहित्य संपदेत ‘लद्दाख में राग-विराग’, ‘किन्नर धर्मलोक’, ‘स्पीती में बारिश’, ‘पृथ्वी परिक्रमा’, ‘बौद्ध निबन्धावलि’ इत्यादी प्रमुख पुस्तके आहेत. सर्जनशील लेखनासाठी त्यांना लोहिया पुरस्कार देण्यात आला होता.