तुम्ही रेल्वेने प्रवास करताय? रेल्वेगाडीची वेळ, ती कधी येणार, कुठून सुटणार?, उशिरा येणार आहे का? रद्द केलीय का? कोणत्या फलाटावर गाडी येणार आहे? रेल्वेगाडीतील आसनव्यवस्था आदी प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला एकाच अॅपवर मिळणार आहेत. प्रवाशांच्या समस्या दूर करण्यासाठी रेल्वे एक मेगा अॅप सुरू करणार आहे. या अॅपद्वारे रेल्वे प्रवाशांना सर्व माहिती मिळणार आहे. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक, पर्यटन पॅकेज तसेच टॅक्सीचीही अगाऊ नोंदणी करता येऊ शकते. जूनमध्ये अॅप लाँच केले जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या अॅपद्वारे मिळू शकणार आहेत. रेल्वेच्या सर्व अॅपवर हे अॅप उपलब्ध असणार आहे. भारतीय रेल्वेद्वारा विकसित करण्यात येणाऱ्या या अॅपचे नाव ‘हिंदरेल’ (HindRail) असू शकते. या अॅपद्वारे रेल्वेगाड्यांचे आगमन-प्रस्थानच्या वेळा, उशिरा धावणाऱ्या गाड्या, रद्द केलेल्या गाड्या, फलाट क्रमांक, सुटण्याच्या वेळा आणि आसन उपलब्धतेची माहिती प्रवाशांना मिळवता येणार आहे. तसेच या अॅपद्वारे टॅक्सी, पोर्टर सर्व्हिस, हॉटेल, टूर पॅकेज, ई-कॅटरिंग आदींची अगाऊ नोंदणी करता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून रेल्वे आणि संबंधित सेवा पुरवठादारांना दरवर्षी सुमारे १०० कोटींचे उत्पन्न मिळेल, असा दावा केला जात आहे. उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळांबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आताही अनेक अडचणी येत आहेत, अशी कबुली रेल्वे बोर्डाच्या एका सदस्याने दिली आहे. जूनमध्ये सुरु होणाऱ्या या अॅपमुळे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या अॅपद्वारे केवळ सूचनाच मिळणार नाही तर रेल्वेगाडीच्या निश्चित ठिकाणाची माहितीही मिळणार आहे.