मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांनी राजकारणामध्ये प्रवेश करण्याआधीच राजकीय वक्तव्य करण्यास सुरुवात केलीय. केरळमधील राजकीय परिस्थितीबद्दल पीटीआयला दिलेल्या मुलाखतीनंतर आता श्रीधरन यांनी केरळमधील लव जिहादसंदर्भात भाष्य केलं आहे. केरळमध्ये लव्ह जिहादची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं सांगत हे प्रकार थांबवण्याची गरज असल्याचे श्रीधरन यांनी म्हटलं आहे. लवकरच श्रीधरन हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. केरळ विधानसभेची निवडणूक एप्रिल-मे महिन्यामध्ये होणार असून त्यापूर्वीच श्रीधरन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाची इच्छा असेल तर मी निवडणूक लढेन असंही ते म्हणालेत.

नक्की पाहा >> ‘मेट्रो मॅन’ भाजपा प्रवेशाआधीच प्रचंड आशावादी; म्हणाले, “केरळमध्ये कमळ फुलवणार आणि गरज पडल्यास…”

लव्ह जिहादसंदर्भात बोलताना श्रीधरन यांनी आपलं मत मांडलं आहे. आपण लव्ह जिहादच्या विरोधात आहोत असं श्रीधरन यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांनी राज्यामध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मुलींची फसवणूक करुन त्यांच्याशी लग्न केली जात असल्याचा आरोप केलाय. “केरळमध्ये काय झालं आहे हे मी पाहिलं आहे. कशाप्रकारे हिंदू मुलींना फसवलं जातं हे मी पाहिलं आहे. तसेच नंतर त्यांचे काय हाल होतात हे ही मी पाहिलं आहे. केवळ हिंदूच नाही, ख्रिश्चन आणि मुस्लीम मुलींचीही फसवणूक करुन त्यांची लग्न लावून दिली जात आहेत,” असं श्रीधरन यांनी म्हटल्याचं एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

नक्की पाहा >> “केंद्र सरकार काहीही करायला गेलं की त्याला विरोध करण्याची फॅशनच आलीय”; शेतकरी आंदोलनावरुन ‘मेट्रो मॅन’ श्रीधरन संतापले

श्रीधरन यांनी केरळ सरकारवरही टीका केली आहे. श्रीधरन यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना हुकूमशहा असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे केरळ सरकारमध्ये भरपूर भ्रष्टाचार होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री खूप कमी वेळ थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधतात अशी टीका करतानाच सीपीएमची लोकप्रियता ओसरल्याचा दावाही श्रीधरन यांनी केलाय. “मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कामासाठी १० पैकी तीन गुणही देता येणार नाही. कोणत्याच मंत्र्याला त्यांच्या इच्छेप्रमाणे काम करता येत नाही. ते जे बोलतील ते शब्दाही त्यांना मागे घ्यावे लागतात,” असं श्रीधरन म्हणालेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने तिकीट दिल्यास पल्लकड आणि मलालापुरम जिल्ह्यांमधून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं श्रीधरन यांनी म्हटलं आहे. सध्याच्या १४० सदस्य असणाऱ्या केरळ विधानसभेमध्ये भाजपाचा केवळ एक आमदार आहे. आपल्याला सक्रीय राजकारणामध्ये रस असून राज्यपाल बननण्याची इच्छा नाहीय असं ८८ वर्षीय श्रीधरन यांनी पीटीआयशी बोलताना आधीच स्पष्ट केलं आहे.