भाजपचे नेतेमंडळी, आमदार आणि खासदार हे कायमच वादग्रस्त विधान करण्यात पुढे असल्याचे गेल्या काही महिन्यात दिसून आले आहे. भाजपचे विप्लव देव यांनी रामायण आणि महाभारत काळात इंटरनेट असल्याचे अकलेचे तारे तोडले होते. तर भाजप नेते सूरजपाल अमू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे शूर्पणखेप्रमाणे नाक कापण्याची धमकी या दिली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तर पंजाब सरकारने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची डोप डेस्ट घेण्याची गरज असून राहुल हे कोकेनची नशा करतात असे वक्तव्य केले होते. भाजपच्या याच वाचाळवीरांच्या यादीत आता अजून एका आमदाराची भर पडली आहे.

उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी बुधवारी एका मुलाखती दरम्यान एक वादग्रस्त विधान केले आहे. ‘हिंदूंची लोकसंख्या वाढविणे गरजेचे आहे. प्रत्येक महंतांची इच्छा आहे की प्रत्येक हिंदू जोडप्याने किमान ५ मुलांना जन्म दिला पाहिजे. असे केले तरच भारतीय ताकद वाढेल आणि देशात हिंदुत्व टिकून राहील, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

सुरेंद्र सिंग यांच्या या वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर टीकादेखील करण्यात येत आहे. ५ मुलांचे पालन पोषण कोण करणार? भाजप सरकारच्या काळात असलेल्या अपत्यांचे पोषण नीट करता आले तरी पुरेसे आहे, अशी टीका नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

दरम्यान, मधल्या काळात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वाचाळवीरांना तंबी दिल्यानंतर काही काळ नेतेमंडळी शांत होते. मात्र गेल्या काही महिन्यात पुन्हा वादग्रस्त विधाने करण्यात येऊ लागली आहेत.