पाकिस्तानमध्ये एका 16 वर्षीय हिंदू तरुणीचं अपहरण करुन जबदरस्ती मुस्लिम तरुणाशी लग्न लावण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मुस्लिम व्यक्तीशी लग्न लावण्याआधी बळजबरीने तिचं धर्मांतर करण्यात आलं. सिंध प्रांतातील थारपाकर येथील सलाम कोट क्षेत्रात ही घटना घडली आहे. तरुणीचं लग्न लावण्यात एका स्थानिक मौलवीचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने याआधीही अनेकांचं जबरदस्तीने धर्मांतर केल्याचं कळत आहे.

सिंध प्रांतातील थारपाकर भागात 80 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. मात्र ते दुर्बळ आणि गरीब आहेत. येथील हिंदू नेहमीच हिंदूविरोधी लोकांच्या निशाण्यावर असतात. येथे हिंदू तरुणींचं अपहरण करत त्यांचं जबरदस्तीने धर्मांतरण करत लग्न करण्याची प्रकरणं नेहमीचीच झाली आहेत. मात्र या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

पाकिस्तानात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर नेहमी चर्चा होत असते. मात्र ना केंद्रातील इम्रान खान सरकार ना सिंध प्रांतातील पाकिस्तान पिपल्स पार्टीकडून यावर काही ठोस पावलं उचलली जातात. काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी हिंदू तरुणींच्या अपहरण आणि लग्नावर चिंता व्यक्त करत हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही घटना थांबलेल्या नाहीत.