मुझफ्फरनगर येथील दंगल आणि दादरी कांडानंतर संवेदनशील बनलेले पश्चिम उत्तर प्रदेश आता एका चांगल्या कारणामुळे चर्चेत आले आहे. आग्रा येथील एक १८ वर्षीय हिंदू मुलगी मुस्लिम मुलांना कुराण शिकवत आहे. येथील संजय नगर कॉलनीतील मंदिरात पुजा कुशवाह रोज सुमारे ३५ मुलांना कोणत्याही प्रकारचे शूल्क न घेता कुराण वाचण्यास शिकवते. अरबी भाषेतील कठीण स्वर योग्य उच्चारणासह ती कुराण वाचण्यास शिकवते. इतक्या कमी वयात पूजाचे कुराणावरचे प्रभुत्व पाहून अनेक मुस्लिम मुलांचे पालक ही आश्चर्यचकित होतात.
याबाबत पुजा टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाली, काही वर्षांपूर्वी आमच्या घराशेजारी संगीता बेगम राहत होत्या. त्यांचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. त्या मुलांना कुराण शिकवत असत. हळूहळू मलाही कुराण वाचण्याची आवड निर्माण झाली आणि मी त्या शिकवणी वर्गाला जाऊ लागले. कमी कालावधीत मी त्यामध्ये गती घेतली. काही कारणांमुळे संगीता बेगम यांना शिकवणी वर्ग बंद करावा लागला. त्यांनी मला आग्रह करून ही शिकवणी सुरू ठेवण्यास सांगितले. जोपर्यंत तुम्ही तुमचे ज्ञान दुसऱ्यांना देत नाही, तोपर्यंत त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नसल्याचे संगीता बेगम यांनी मला समजावून सांगितले.
अनेक मुले गरीब घरातून येतात. हा वर्ग घेण्यासाठी जेव्हा माझ्या घरातील जागा कमी पडली. तेव्हा परिसरातील लोकांनी मला यासाठी मंदिरात जागा दिली, असे पुजाने सांगितले. पुजाची मोठी बहीण नंदिनी आहे. तीही मुलांना हिंदी आणि गीता शिकवते.