खासगी शाळांनी हिंदू विद्यार्थ्यांकडून नाताळच्या सणाची वर्गणी घेऊ नये. तसेच त्यांच्यावर हा सण साजरा करण्याची सक्ती करू नये, असा इशारा हिंदू जनजागरण मंचाने दिला आहे. त्यासाठी हिंदू जनजागरण मंचाकडून उत्तर प्रदेशात जिल्हा स्तरावर एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेचे सदस्य त्या परिसरातील खासगी शाळांमध्ये जाऊन यासंबंधीचे निवेदन संस्थाचालकांना देतील.

खासगी शाळा या नाताळच्या सणाच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत असल्याचा आरोप हिंदू जनजागरण मंचाने केला आहे. त्यासाठी आम्ही राज्यातील प्रत्येक शाळेत जाऊन हा प्रकार त्वरीत थांबविण्याची मागणी करणार आहोत. ज्या शाळा हा आदेश जुमानणार नाहीत, त्याठिकाणी आंदोलन करण्याचे आदेशही संघटनेने जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांना दिले आहेत. दरम्यान, सरकारने अशा कोणत्याही आदेशाबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहेत.

कुणीही नाताळचा साजरा करण्याला आमचा विरोध नाही. मात्र, खासगी शाळांनी हिंदू विद्यार्थ्यांना या सणासाठी वर्गणी देण्याची सक्ती करू नये. आम्ही शाळेचे मुख्याधापक आणि संचालकांना यासंबधीचे लेखी निवेदन देऊ. त्यादृष्टीने आम्ही खासगी शाळांची यादी तयार करायला सुरुवात केल्याची माहिती उत्तर प्रदेशातील हिंदू जनजागरण मंचाचे अध्यक्ष विजय बहादुर सिंह यांनी दिली.

तर हिंदू जनजागरण मंचाच्या अलिगढ येथील प्रमुख सोनू सविता यांनी म्हटले आहे की, मिशनरी आण खासगी शाळांमधील बहुतांश विद्यार्थी हिंदू असतात. या शाळांमध्ये ख्रिश्चन विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे या शैक्षणिक संस्थांच्या उत्त्पन्नाचा मुख्य स्त्रोत हिंदू विद्यार्थीच असतात. या शाळा नाताळ साजरा करून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत असल्याचे आम्ही त्यांना सांगितले आहे. त्यानुसार आता आमचे कार्यकर्ते शाळांना भेट देऊन इशारावजा पत्र देतील, असे सोनू सविता यांनी सांगितले. तरीही एखाद्या शाळेने विद्यार्थ्यांवर नाताळ साजरा करण्याची सक्ती केली तर आम्ही त्या शाळेबाहेर आंदोलन करू. या आंदोलनाचे स्वरूप लवकरच निश्चित केले जाईल, अशी माहितीही हिंदू जनजागरण मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.