अभिनेत्री सनी लिओनी हिच्या पॉर्न संकेतस्थळावर बंदी घालण्यासाठी हिंदू जनजागरण समितीने मोहीम हाती घेतली आहे. येत्या १० सप्टेंबरपासून समितीचे कार्यकर्ते काशीतील शास्त्री घाटापासून या मोहीमेचा प्रारंभ करणार आहेत.
भारतामध्ये सनी लिओनीच्या पॉर्न वेबसाइटवर बंदी घालण्यात यावी, ही समितीची मुख्य मागणी आहे. काशी ही भारताची सांस्कृतिक राजधानी असल्यामुळे मोहिमेस येथून सुरूवात करत असल्याचे समितीने म्हटले आहे. यासाठी हिंदू जनजागरण समितीतर्फे सध्या जोरदार ऑनलाईन प्रचारही केला जात आहे. सनी लिओनीवर बंदी घाला आणि देश वाचवा, अशा आशयाचे एक पोस्टर हिंदू जनजागरण समितीच्या संकेतस्थळावर झळकत आहे. यामध्ये सनी लिओनीच्या पॉर्न संकेतस्थळामुळे तरूण मनांवर कशाप्रकारे वाईट परिणाम होतात?, याबद्दल समितीकडून भूमिका मांडण्यात आली आहे. याशिवाय, चांगले भविष्य हवे असल्यास सरकारला सनी लिओनीला देशाबाहेर पाठवायला सांगा, असाही प्रचार केला जात आहे. तसेच पोस्टरच्या शेवटी सनी लिओनीवर बंदीच्या मागणीसाठी ऑनलाईन याचिका दाखल करण्याचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
भारतामध्ये अनेक पॉर्न संकेतस्थळे पाहिली जातात. मात्र, एकट्या सनी लिओनीच्याच वेबसाइटवर बंदी का? असा प्रश्न केला असता समितीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, पॉर्न अभिनेत्री म्हणून सनी लिऑनची मोठी ओळख झाली आहे. भारतामधून सनीच्या नावाने सर्वाधिक नेटिझन्स सर्च करताना दिसतात. शिवाय, तिचेच संकेतस्थळ सर्वाधिक पाहिले जाते. दिवसेंदिवस सनीची लोकप्रियता वाढत आहे, खरे तर हे भारतीय संस्कृतीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे पॉर्न वेबसाइट बंद करायला हव्यात. याबाबतीत आम्ही एक-एक पाऊल पुढे टाकत जाणार आहोत, असे स्पष्टीकरण समितीतर्फे देण्यात आले.