मेरठ या शहराचे नाव बदलून ते गोडसे नगर ठेवा अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे. सध्या उत्तरप्रदेशात नावं बदलली जात आहेत. अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्यात आले आहे तर फैजाबादचे नाव अयोध्या असे ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आता मेरठचे नाव गोडसे नगर ठेवले जावे अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे.

मेरठमध्ये गुरुवारी नथुराम गोडसे आणि नाना आपटे या दोघांचा बलिदान दिवस साजरा करण्यात आला. ज्यानंतर हिंदू महासभेने मेरठचे नाव बदलून गोडसे नगर ठेवावे अशी मागणी केली आहे. एवढेच नाही तर गाझियाबादचे नाव दिग्विजय नगर आणि हापुडचे नाव बदलून महंत अवैद्यनाथ असे ठेवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

नथुराम गोडसेच्या प्रतिमेला हार घालून यज्ञ करण्यात आला. हिंदू महासभेचे महामंत्री मुन्ना कुमार शर्मा या कार्यक्रमाला हजर होते. नथुरामसारख्या देशभक्ताची आपल्या देशाला गरज आहे असे वक्तव्य यावेळी शर्मा यांनी केले. नथुराम गोडसे हे प्रखर विचारांचे राष्ट्रभक्त होते आपण त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे असे हिंदू महासभेचे उपाध्यक्ष अशोक शर्मा यांनी म्हटले आहे.