भारत दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (बुधवारी) गुजरातमधील सय्यद मशिदीला भेट दिली. या भेटीबद्दल अखिल भारतीय हिंदू महासभेने नाराजी व्यक्त केली. मोदींची कृती हिंदू धर्मविरोधी असल्याची टीका हिंदू महासभेकडून करण्यात आली आहे. या कृतीबद्दल भारतातील हिंदू मोदींना कधीही माफ करणार नाहीत, अशा कठोर शब्दांमध्ये महासभेने मोदींच्या मशिद भेटीचा निषेध केला.

मोदींच्या मशिद भेटीच्या कृतीमुळे देशभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे हिंदू महासभेने म्हटले. ‘शिंजो आबे यांना मशिदीऐवजी सोमनाथ मंदिर, द्वारका, ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवायला हवे होते. भारत एक हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र हिच भारताची जगभरातली ओळख आहे. भगवान शंकर, राम आणि कृष्ण भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. त्यामुळेच जपानी पंतप्रधानांना घेऊन गुजरातमधील हिंदू देवदेवतांच्या भव्य मंदिरांना भेट द्यायला हवी होती. मात्र मोदींनी असे केले नाही. त्यांची ही कृती हिंदू आणि भारतविरोधी आहे,’ असे हिंदू महासभेचे राष्ट्रीय महासचिव मुन्ना कुमार यांनी म्हटले.

गुजरातमधील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदींनी मशिदीला भेट दिली, असेही मुन्ना कुमार यांनी म्हटले. ‘पंतप्रधानांचे हे पाऊल अल्पसंख्यकांचे लांगुलचालन करणारे आहे. अल्पसंख्यांकांच्या लांगुलचालनामुळेच आज काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. भाजपनेदेखील तेच केल्यास त्यांनादेखील सत्ता गमवावी लागेल,’ असेही ते म्हणाले. जपानचे पंतप्रधान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल त्यांचे गुजरातमध्ये आगमन झाले. यावेळी मोदींनी गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले. यानंतर मोदींनी त्यांच्यासह रोड शो केला. मोदींनी आबेंसह साबरमती आश्रम आणि सिदी सय्यद मशिदीला भेट दिली.

आबे यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. सकाळी शिंजो आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’च्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. हा प्रकल्प १.८ लाख कोटींचा असणार आहे. हा प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित होते.